नांदेड ७ जुलै प्रतिनिधी
शहरातील चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी तब्बल २४ लाख रुपये किमतीचे १६० ग्राम (तोळे) सोन्याचे दागिने जप्त केले असून, याप्रकरणी दोन महिला आरोपींना अटक केली आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पडली धाड
भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकातील पोउपनि विनोद देशमुख व त्यांचे पथक भागात पेट्रोलिंग करत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. श्रीनगर परिसरात काही संशयास्पद महिला फिरत असल्याची ती माहिती होती. या माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित महिलांना ताब्यात घेतले.
अशा आल्या पोलिसांच्या जाळ्यात…
ताब्यात घेतलेल्या महिलांची सखोल चौकशी करण्यात आली. तसेच सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला असता, भाग्यनगर पोलीस स्टेशन येथील गुन्हा क्र. ०९/२०२६, कलम ३०३(२), ३(५) बी.एन.एस. मधील त्या संशयित असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केला. त्यांच्याकडून चोरी गेलेले १६० ग्राम सोन्याचे दागिने (किंमत सुमारे २४ लाख रुपये) पोलिसांनी जप्त केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील महिला आरोपींना अटक
या प्रकरणात पोलिसांनी खालील दोन महिला आरोपींना अटक केली आहे:
१. लक्ष्मी गणेशराव साखरे उर्फ मंजू रेड्डी (वय ४६ वर्षे, मूळ रा. भोपाळ, मध्यप्रदेश, ह.मु. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर)
२. पूजा सोनू उर्फ लक्केप्पा साखरे (वय २६ वर्षे, ह.मु. चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर)
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव, पोलीस उप अधीक्षक (शहर) रामेश्वर वैंजने यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोउपनि विनोद देशमुख, पोउपनि नरेश वाडेवाले, तसेच पोलीस अंमलदार विशाल माळवे, विष्णूकांत मुंडे, सुधाकर मलदोडे, राजीव घुले, नागनाथ चापके, राहुल लाटकर, अदनान पठाण आणि अंकुश कांबळे यांनी केली आहे.
वृत्त संकलन व बातमी:
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.












