नांदेड २४ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील मालमत्ता आणि शरीराविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालणे, सराईत गुन्हेगारांवर कडक नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळी धडक ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट आदेशानुसार गुरुवारी (दि. २३ जुलै) मध्यरात्री ११:०० वाजल्यापासून ते शुक्रवारी (दि. २४ जुलै) पहाटे ३:०० वाजेदरम्यान हे विशेष मोहीम राबवून गुन्हेगारांचे धाबे दणाणले.
मध्यरात्री ५९ अधिकारी व २१२ अंमलदार रस्त्यावर!
या विशेष मोहिमेत संपूर्ण जिल्ह्याभरात ५९ पोलीस अधिकारी आणि २१२ पोलीस अंमलदारांच्या पथकांनी एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. यात अपर पोलीस अधीक्षक नांदेड व भोकर, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) तसेच आरसीपी (RCP) पथकाने प्रत्यक्ष मैदानात उतरून धडक तपासणी केली.
सराईत गुन्हेगार, तडीपार व वॉरंटधारकांची झाडाझडती
या चार तासांच्या मोहिमेदरम्यान पोलीस दलाने गुन्हेगारांची सखोल पडताळणी केली:
- तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार: कलम ५५, ५६, ५७ अंतर्गत असलेल्या ३७ तडीपार व प्रस्तावित गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
- एमपीडीए (MPDA) गुन्हेगार: एमपीडीए कायद्यांतर्गत सुटलेल्या ३४ गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.
- सराईत गुन्हेगार: मालमत्ता व शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या ८९ सराईत गुन्हेगारांची तपासणी केली गेली.
- समन्स व वॉरंट बजावणी: मोहिमेदरम्यान २४ जामीनपात्र (BW), २२ गैरजामीनपात्र (NBW) वॉरंट आणि ३९ समन्सची यशस्वी बजावणी करण्यात आली.
विविध पोलीस ठाण्यांत ८ गुन्हे दाखल; ८ आरोपी अटकेत
तपासणीदरम्यान अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करत विविध पोलीस ठाण्यांमध्ये आर्म ॲक्टचे ५ गुन्हे आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२२ व १४२ अन्वये ३ गुन्हे असे एकूण ८ गुन्हे दाखल करून ८ आरोपींना अटक करण्यात आली.
- इतवारा पो.स्टे.: आर्म ॲक्ट कलम ३/२५ आणि ४/२५ अन्वये २ गुन्हे दाखल (२ आरोपी).
- स्थागुशा/वजिराबाद पो.स्टे.: आर्म ॲक्ट कलम ४/२५ अन्वये १ गुन्हा दाखल (१ आरोपी).
- वजिराबाद पो.स्टे.: आर्म ॲक्ट कलम ४/२५ आणि म.पो.का. कलम १२२ अन्वये २ गुन्हे दाखल (२ आरोपी).
- भाग्यनगर पो.स्टे.: आर्म ॲक्ट कलम ४/२५ आणि म.पो.का. कलम १२२ अन्वये २ गुन्हे दाखल (२ आरोपी).
- शिवाजीनगर पो.स्टे.: म.पो.का. कलम १२२ अन्वये १ गुन्हा दाखल (१ आरोपी).
नांदेड पोलीस प्रशासनाने राबवलेल्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा इशारा मिळाला असून, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यापुढेही अशा प्रकारच्या धडक कारवाया सुरूच राहतील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.












