नांदेड २४ जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी व्यापक जागरूकता निर्माण करणे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि सुरक्षित वाहतुकीची संस्कृती रुजविण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्हाभर विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या अभियानांतर्गत शहर वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. मारोती मुंढे यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक शाखेचे अधिकारी, कर्मचारी तसेच स्वयंसेवक श्री. घनश्याम ओझा यांच्या सहकार्याने नांदेड शहरातील विविध शाळांना प्रत्यक्ष भेटी दिल्या जात आहेत. यामध्ये महात्मा फुले हायस्कूल, गुजराती हायस्कूल, नागार्जुना हायस्कूल, महानगर पालिका प्राथमिक शाळा आणि जिजामाता हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन अन् संवादातून मार्गदर्शन
जनजागृतीदरम्यान विद्यार्थ्यांना
- पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT) आणि माहितीपूर्ण व्हिडिओ दाखवले जात आहेत.
- प्रत्यक्ष उदाहरणे, प्रश्नोत्तरे आणि संवादात्मक पद्धतीने रस्ते अपघातांची कारणे व त्यावरील उपाययोजना समजावून सांगितल्या जात आहेत.
- प्रत्येक नागरिकाची रस्ते सुरक्षिततेबाबत काय जबाबदारी आहे याचे प्रभावी धडे दिले जात आहेत.
शहरातील वाढती वाहतूक व अपघातांचे प्रमाण लक्षात घेता विद्यार्थ्यांपासूनच वाहतूक शिस्तीचे संस्कार व्हावेत हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार नागरिक असल्याने त्यांनी स्वतः नियमांचे पालन करावे आणि आपल्या कुटुंब व समाजातही वाहतूक सुरक्षिततेबाबत जनजागृती करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.
“वाहतूक शिस्त ही केवळ कायद्याचे पालन नसून प्रत्येकाच्या जीविताच्या सुरक्षेशी संबंधित सामाजिक जबाबदारी आहे. सर्व वाहनचालक, पालक, विद्यार्थी व नागरिकांनी वाहतूक नियमांचे प्रामाणिकपणे पालन करून सुरक्षित, शिस्तबद्ध व अपघातमुक्त नांदेड घडवण्यासाठी योगदान द्यावे
डॉ. निलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड












