नांदेड ९ सप्टेंबर प्रतिनिधी
वृद्ध महिलेची दिशाभूल करून आणि बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी (चैन) लांबवणाऱ्या दोन अट्टल आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा (LCB), नांदेडच्या पथकाने अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले आहे. धर्माबाद येथील आंध्र बसस्टँड परिसरातून या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ४८,०००/- रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
घटनेची पार्श्वभूमी व कारवाईचा तपशील: नांदेड जिल्ह्यातील चैन स्नेचिंग व मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. या मोहिमेअंतर्गत दि. ०७/०९/२०२६ रोजी पोउपनि नागनाथ तुकडे व त्यांचे पथक धर्माबाद उपविभागात गस्त घालत असताना, गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की, दोन संशयित इसम आंध्र बसस्टँड परिसरात फिरत आहेत.
पोलीस पथकाने तात्काळ तेथे जाऊन पाहणी केली असता, पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
आरोपींची नावे: १) गणेश सुभाष वाघमारे (वय ३० वर्षे) २) महेश उर्फ सुनील अशोक वाघमारे (वय ३० वर्षे) (दोघे रा. साठेनगर, शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर, जि. लातूर)
गुन्ह्याची कबुली व मुद्देमाल जप्त: आरोपींकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सुमारे ८ ते १० दिवसांपूर्वी धर्माबाद येथील नगर परिषद रोडवर एका वृद्ध महिलेला बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी लांबवल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलीस ठाणे धर्माबाद येथे गु.र.नं. २०९/२०२६, कलम ३१८(२)(३)(५) BNS अन्वये गुन्हा नोंद आहे.
पोलीस पंचांसमक्ष घेतलेल्या अंगझडतीत आरोपींच्या खिशातून ₹४८,०००/- ची रोकड हस्तगत करून ती जागीच जप्त करण्यात आली आहे. आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी धर्माबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
तपासी पथक: ही कामगिरी नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागनाथ तुकडे, तसेच पोलीस अंमलदार दारासिंग राठोड, मोहन आवके, लहू चाटे, आबाराव पिंगलवाड, महेश बडगू आणि अमोल सातारे यांनी यशस्वीपणे पार पाडली.
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












