नांदेड ९ सप्टेंबर (विशेष प्रतिनिधी)
तरुणाई ही देशाची खरी शक्ती असून विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहून सायबर गुन्ह्यांबाबत सजग राहावे, कायद्याचे पालन करून एक जबाबदार नागरिक बनावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन (IPS) यांनी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि ‘स्वयंसिद्धा’ स्त्रीशक्ती उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अधिसभा सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांनी ‘अंमली पदार्थ, सायबर सुरक्षा, महिलांच्या संरक्षणासाठी कायदे, वाहतूक नियम आणि डायल ११२’ या विषयांवर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
सायबर सुरक्षेसाठी ‘गोपनीयता’ बाळगा सायबर गुन्ह्यांबाबत खबरदारी घेताना डॉ. निलाभ रोहन यांनी सांगितले की, मोबाईलचा OTP, UPI PIN, ATM PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, संशयास्पद ॲप डाउनलोड करणे किंवा अनोळखी व्यक्तींना मोबाईलचा रिमोर्ट ॲक्सेस देणे टाळावे. डिजिटल अरेस्ट, फेक प्रोफाईल, बनावट नोकरीच्या ऑफर, ऑनलाईन लोन व लॉटरीच्या आमिषाला बळी पडू नका, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अडचण आल्यास काय कराल?
- सायबर फसवणूक झाल्यास: घाबरून न जाता तात्काळ १९३० (1930) या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. स्क्रीनशॉट, व्यवहार पुरावे, संदेश जतन करून जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा सायबर पोलिसांत तक्रार नोंदवावी.
- आणीबाणीच्या प्रसंगी: तातडीच्या मदतीसाठी डायल ११२ (Dial 112) या सेवेचा वापर करावा आणि त्याचा गैरवापर टाळावा.
महिला सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नांदेड पोलिसांतर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी ‘ऑपरेशन कवच’, ‘मिशन समाधान’, ‘दामिनी पथक’, ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी पथक’, ‘चार्ली पथक’ आणि ‘ॲंटी थेप्ट पेट्रोलिंग’ यांसारखे विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर, सीट बेल्ट, वेगमर्यादा पाळणे आणि मद्यप्राशन करून वाहन न चालवणे या वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“सतर्क विद्यार्थी – सुरक्षित समाज” या भावनेतून प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतः जागरूक राहून इतरांनाही जागरूक करावे. – डॉ. निलाभ रोहन (IPS), पोलीस अधीक्षक, नांदेड
– प्रतिनिधी, माधव वाघमारे












