नांदेड १६ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे)
बनावट शेतजमिनीचे बनावट दस्तऐवज आणि बनावट सातबारा तयार करून एकापेक्षा अधिक व्यक्तींना परस्पर विक्रीचा करार (सौदाचिट्ठी) करत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणाऱ्या एका संघटित रॅकेटचा वजीराबाद पोलीस ठाणे व नांदेड शहर उपविभागीय पोलीस पथकाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी राहुल नागोराव गायकवाड व त्याचा साथीदार जखाजी उर्फ बंडू धोंडजी पावडे या दोघांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
अशी आहे घटनेची पार्श्वभूमी व फसवणुकीचा प्रकार:
जानेवारी २०२६ मध्ये मुख्य आरोपी राहुल गायकवाड याने फिर्यादी देवेंद्र शर्मा यांच्या कपड्याच्या दुकानावर खरेदीच्या बहाण्याने येऊन ओळख निर्माण केली. आरोपीने मेढला खुर्द (ता. अर्धापूर, जि. नांदेड) येथील शेत गट क्र. ७३ मधील जमीन स्वतःच्या मालकीची असल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर राहुल गायकवाड, विशाल गायकवाड व माणिक उर्फ बाबू सरोदे यांनी फिर्यादीस बनावट सातबारा व नोंदणीकृत कागदपत्रे दाखवून जागेची पाहणी घडवून आणली.
या जमिनीचा एकूण व्यवहार १ कोटी २६ लाख रुपयांत ठरून १८ फेब्रुवारी २०२६ रोजी एकादशी हॉटेल (मालेगाव रोड, नांदेड) येथे नोटरीकृत सौदाचिट्ठी तयार करण्यात आली. आरोपींनी फिर्यादीकडून हॉटेलमध्ये ३० लाख रुपये रोख आणि दुकानासमोर रात्री ५ लाख रुपये रोख असे एकूण ३५ लाख रुपये स्वीकारले.
सौदा झाल्यानंतर आरोपींनी सदर जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करून इतर अनेकांना विकल्याचे उघडकीस आले. फिर्यादीने दिलेले ३५ लाख रुपये परत मागितले असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे देऊन रक्कम हडप केल्याचे समोर आले.
३५ नागरिकांची फसवणूक; १ कोटी ८५ लाखांचा अपहार:
या प्रकरणी वजीराबाद पोलीस ठाण्यात गु.र.नं. २२६/२०२६ कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने उपविभागीय पोलीस अधिकारी मा. रामेश्वर वैंजने (नांदेड शहर) यांच्याकडे दिनांक १३ सप्टेंबर २०२६ रोजी सदर गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आला.
तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर केलेल्या सखोल चौकशीत ही रॅकेट केवळ एकाच व्यवहारापुरती मर्यादित नसून, आरोपींनी एकाच जमिनीच्या आधारे अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचे समोर आले. तपासात आजपावेतो तब्बल ३५ नागरिकांची १ कोटी ८५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान आरोपींकडून १४ चौदा चिठ्ठी/कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
अटक आरोपींचे विवरण:
१. राहुल नागोराव गायकवाड (वय ३८ वर्षे, व्यवसाय: शेती व व्यापार, रा. शिवरायनगर, मालेगाव रोड, नांदेड; मूळ रा. गणपूर, ता. अर्धापूर, जि. नांदेड) – यास दि. १६/०९/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २. जखाजी उर्फ बंडू धोंडजी पावडे (वय ४३ वर्षे, रा. घर क्र. ५१/१, मु.पो. पुयणी, ता. जि. नांदेड) – यास दि. १४/०९/२०२६ रोजी गुन्हे शोध पथक, भाग्यनगर यांच्याकडून अटक करण्यात आली असून त्यास दि. २८/०९/२०२६ पर्यंत न्यायालयीन कोठडीत रवाना करण्यात आले आहे.
या गुन्ह्यातील इतर आरोपी:
- अमोल अशोकराव मालेगावकर (वय ४२ वर्षे, रा. घर नं. ४४ जोतीबा नगर, माणिकनगरच्या पाठीमागे, तरोडा बु., नांदेड) – यास दि. १५/०९/२०२६ रोजी अटक करण्यात आली असून आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.
- आरोपी राहुल नागोराव गायकवाड, अमोल अशोकराव मालेगावकर व जखाजी उर्फ बंडू धोंडजी पावडे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता; पोलिसांचे आवाहन:
आरोपींच्या प्राथमिक चौकशीतून गुन्ह्याची व्याप्ती अत्यंत मोठी असल्याचे निष्पन्न होत आहे. या व्यवहारात वेगवेगळे स्थानिक प्रॉपर्टी डीलर्स व दलालांचा सहभाग असून, एकाच मिळकतीचे वारंवार खोटे दस्त बनवणारी संघटित टोळी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. नमूद आरोपींविरुद्ध न्यायालयात यापूर्वीही सुमारे १२ दिवाणी व फौजदारी दावे दाखल असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
ही धडक कारवाई मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलीस अधीक्षक, नांदेड) व मा. सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी मा. रामेश्वर वैंजने (उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग नांदेड शहर) व त्यांच्या पथकाने, तसेच स्थानिक गुन्हे शाखा येथील पोनि./अतुल भोसले व पोउपनि मिलिंद सोनावळे व त्यांचे पथक आणि भाग्यनगर गुन्हे शोध पथकाने केली आहे.
पोलीस प्रशासनाचे नागरिकांना आवाहन: “नागरिकांनी कोणतीही स्थावर मिळकत, शेतजमीन किंवा प्लॉट खरेदी करताना संबंधित जमिनीची महसूल विभागाकडून मूळ मालकी, ७/१२ उतारा, फेरफार नोंद व कायदेशीर दस्तऐवजांची संपूर्ण खात्री करूनच आर्थिक व्यवहार करावेत. परस्पर खाजगी सौदाचिट्ठीवर अथवा अनधिकृत दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये. ज्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक झाली असेल, त्यांनी तत्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय (नांदेड शहर) किंवा वजीराबाद पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.”












