नांदेड १७ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे)
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील माता गुजरीजी विसावा उद्यान येथे राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपरिक ऊर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. याप्रसंगी हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील शेतकरी, युवक आणि नागरिकांसाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची माहिती दिली.
पालकमंत्री अतुल सावे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
- शेतकऱ्यांना मदतीची ग्वाही: यंदा अल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहून पिकांचे नुकसान झाले आहे. शासन या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना मदत करेल.
- कर्जमाफी व वीजबिल सवलत: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील ६४,२७९ शेतकऱ्यांच्या खात्यांवर ४८८ कोटी १९ लाख रुपये जमा झाले आहेत. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच वीजबिलात सवलत दिल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले.
- पीक विमा व किसान सन्मान निधी: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ९६६ कोटी रुपये तर किसान सन्मान निधीच्या २३ व्या हप्त्यापोटी ७६ कोटी ५३ लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
- ‘सेवा संकल्प अभियान’ (१७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल समाधान शिबिरे, सेवा सेतू, विकसित भारत संकल्प यात्रा व जल-जन यात्रा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
- रोजगार महाकुंभ (२९ सप्टेंबर २०२६): राज्यभरात ५०० तर नांदेड जिल्ह्यात २२ ठिकाणी रोजगार मेळावे आयोजित केले जाणार असून युवकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
- आरोग्य सुविधांचा विस्तार: जिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून ५०० खाटांपर्यंत वाढवण्यात येत आहे. जिल्ह्यात ३७ डायलिसिस यंत्रे, ३ सीटी स्कॅन, एमआरआय व सोनोग्राफी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून १,९७४ रुग्णांना १४ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.
- इतर विकासकामे व कल्याणकारी योजना: अण्णासाहेब पाटील महामंडळाद्वारे २,६३१ लाभार्थ्यांना २०६ कोटी ३० लाख रुपयांचे कर्जवाटप झाले आहे. स्वाधार योजनेचा ८,५१६ विद्यार्थ्यांना लाभ मिळाला असून मुखेड व कंधार येथे संत भगवान बाबा ऊसतोड कामगार वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत.
- अपघाताबद्दल शोक व्यक्त: भोकर-बारड महामार्गावरील सीताखंडी घाटात झालेल्या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांप्रती पालकमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून प्रशासनाला आवश्यक उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.
या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार भीमराव केराम, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे जिल्हा परिषद सिओ महेश पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.












