नांदेड २८ मार्च प्रतिनिधी
शहरात वाढत्या चोऱ्या आणि शरीराविरुद्धच्या गुन्ह्यांना पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (२८ मार्च) पहाटे ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ राबवण्यात आले. या धडक मोहिमेमुळे सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपासणी आणि अटकेची कारवाई केली आहे.
पहाटे ४ वाजल्यापासून कारवाईला सुरुवात
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेले हे कोम्बिंग ऑपरेशन पहाटे ४:०० वाजता सुरू होऊन सकाळी ८:०० वाजेपर्यंत चालले. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा (LCB), शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी आणि सुमारे ११५ अंमलदारांनी सहभाग घेतला होता. शहराच्या विविध भागांत एकाच वेळी ही कारवाई करण्यात आली.
कारवाईचा तपशील खालीलप्रमाणे:
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी गुन्हेगारांची झाडाझडती घेत असताना खालीलप्रमाणे कारवाई केली:
- सराईत गुन्हेगारांची तपासणी: मालमत्ता व शरीराविरुद्ध गुन्हे करणाऱ्या ६८ सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
- वॉरंट बजावणी: एकूण २७ वॉरंटची बजावणी करण्यात आली, ज्यामध्ये १७ जामीनपात्र (BW) आणि १० अजामीनपात्र (NBW) वॉरंटचा समावेश आहे.
- शस्त्र प्रतिबंधक कारवाई: आर्म ॲक्ट अंतर्गत २४ गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली.
- तडीपार आरोपी: ९ तडीपार आरोपींची तपासणी करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
- इतर कारवाया: १६ समन्स बजावण्यात आले, तर १० गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने तपासणी झाली.
विनापरवाना पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
या मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करण्यात आली. शेख रिझवान शेख निसार, शेख शाहीद शेख चाँद, शेख सोहेल शेख इब्राहिम, शेख आदिल शेख शकील आणि आनंद ऊर्फ चिन्नू सरदार यादव यांच्याकडून विनापरवाना पिस्तूल, जिवंत काडतुसे आणि खंजर जप्त करण्यात आले आहेत. या पाचही जणांविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक बसवण्यासाठी यापुढेही अशा प्रकारची ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ मोहीम सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे नांदेड












