नांदेड २० एप्रिल प्रतिनिधी
शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी नांदेड पोलिसांनी व्यापक स्तरावर ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवले आहे. पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या ९ दिवसांत करण्यात आलेल्या या धडक कारवाईत ११९ पेक्षा जास्त आरोपींवर कारवाई करण्यात आली असून, अनेक ‘ऑन रेकॉर्ड’ गुन्हेगारांची कसून तपासणी करण्यात आली आहे.
रात्रभर चालली तपासणी मोहीम
दिनांक १९ एप्रिल रोजी रात्री ११:०० वाजेपासून ते २० एप्रिल रोजी पहाटे ३:०० वाजेपर्यंत नांदेड शहरात विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक (भोकर), उपविभागीय पोलीस अधिकारी (नांदेड शहर, इतवारा, भोकर), स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तसेच शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि अंमलदार असा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता.
कारवाईचा तपशील (१९ एप्रिल रात्रीची मोहीम):
या एका रात्रीच्या मोहिमेत पोलिसांनी मालमत्ता विरुद्धचे गुन्हे, शरीराविरुद्धचे गुन्हे, अवैध शस्त्र बाळगणारे आणि तडीपार आरोपींची तपासणी केली. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
- तपासणी केलेले तडीपार गुन्हेगार: ३९
- MPDA मधून सुटलेले गुन्हेगार: २३
- शरीराविरुद्धचे सराईत गुन्हेगार: ५२
- आर्म ॲक्टमधील गुन्हेगार: २७
- फरारी/पाहिजे असलेले आरोपी: २१
- एकूण अधिकारी व कर्मचारी: ३० अधिकारी आणि १०१ अंमलदार
९ दिवसांतील कामगिरीचा आढावा
दिनांक ६ एप्रिल ते १३ एप्रिल आणि त्यानंतर १६ व १९ एप्रिल रोजी राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत पोलिसांनी लक्षणीय कामगिरी केली आहे.
१. तडीपार आरोपींवर कारवाई: मुंबई पोलीस कायद्याच्या कलम ५५, ५६/५७ प्रमाणे तडीपार केलेल्या ३० व्यक्तींची तपासणी केली असता, त्यातील ८ जण शहरातच वावरताना आढळले. त्यांच्यावर कलम १४२ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२. सराईत गुन्हेगार: MPDA मधून सुटलेले आणि इतर सराईत अशा एकूण ९८ आरोपींची तपासणी करून ८५ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
३. प्रतिबंधात्मक कारवाई: कलम ११०/११७ नुसार दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
नांदेड पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. आगामी काळातही अशाच प्रकारे अचानक तपासणी आणि कोम्बिंग ऑपरेशन सुरू राहणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
वृत्त संकलन
प्रतिनिधी, माधव वाघमारे











