नांदेड | दि. २९ डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्यांविरोधात नांदेड सिटी ड्रिंक सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत पोलिस प्रशासनाने जोरदार मोहीम राबवली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, वजीराबाद चौक, नांदेड यांच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी शहरातील विविध सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सिटी ड्रिंक सेफ्टी पथकाचे प्रमुख तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी सहभागी होते.
कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे
1️⃣ पोलीस स्टेशन वजीराबाद
रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंगदरम्यान १४ संशयित वाहनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करून १०,००० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच परिसरातील दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली.
2️⃣ पोलीस स्टेशन शिवाजीनगर
कविता स्टेशनरी परिसरात सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणारे २ इसम आढळून आले. त्यांच्यावर कलम ११०/११७ म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली. परिसरातील दारू विक्री ठिकाणांची तपासणीही करण्यात आली.
3️⃣ पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण
एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंगदरम्यान ३ इसम मद्यधुंद अवस्थेत आढळले. त्यांच्यावरही कलम ११०/११७ म.पो.का. प्रमाणे कारवाई करण्यात आली असून, हॉटेल्स व वाईन शॉप्सची तपासणी करण्यात आली.
4️⃣ पोलीस स्टेशन इतवारा
जुना मोंढा परिसरात ४ इसम दारूच्या बाटल्या व ग्लाससह सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना आढळले. त्यांच्यावर कलम ६८ म.प्र.का. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
5️⃣ दामिनी पथक
विसावा गार्डन व शिवमंदिर परिसरात पेट्रोलिंगदरम्यान ६ इसम सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालताना आढळले. त्यांच्यावर शिवाजीनगर व विमानतळ पोलीस ठाण्यात कलम ११०/११७ म.पो.का. अंतर्गत कारवाई करण्यात आली.
⚠️ पोलिसांचा इशारा
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, नांदेड शहरातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा सार्वजनिक शांतता भंग करणे सहन केले जाणार नाही. अशा प्रकारांवर भविष्यातही कडक आणि कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.












