नांदेड, दि. २ जानेवारी :- (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरात वाढत्या जड वाहनांच्या वर्दळीमुळे वाहतूक कोंडी, अपघात व त्यातून होणारी जीवितहानी यासारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसह शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून दि. ७ जानेवारी २०२६ पासून नांदेड शहरात सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना प्रवेशबंदी लागू करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.
या संदर्भात अधिकृत अधिसूचना निर्गमित करण्यात आली असून तिचा प्रत्यक्ष अंमल दि. ७ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांवर जड वाहनांच्या वर्दळीमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने विविध संघटना तसेच नागरिकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदने प्राप्त झाली होती.
या अनुषंगाने दि. १६ डिसेंबर रोजी जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक, मार्ग परिवहन अधिकारी नांदेड यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत सविस्तर चर्चा करून जड वाहनांच्या वेळेवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत जड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास मनाई राहणार आहे.
या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन अपघातांचे प्रमाण घटेल, तसेच नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीचा लाभ मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. सर्व संबंधित जड वाहनधारकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनीही केले आहे.












