(प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड, दि. ८ जानेवारी नांदेड जिल्ह्यातील विविध बसस्थानकांवर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या अंगावरील व पर्समधील दागिने चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ११.०७ तोळे सोन्याचे व १६ तोळे चांदीचे दागिने असा एकूण ५,६८,२९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती अर्चना पाटील (भोकर) व मा. श्री. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सक्रिय झाले होते. पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पोउनि. महेश कोरे व पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली.
दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी मिळालेल्या माहितीवरून संशयित चार महिला नांदेड जिल्ह्यातील बसस्थानकांवर चोरीच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून चारही महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड, हदगाव, कंधार, बिलोली, अर्धापूर व लोहा येथील बसस्थानकांवर प्रवासी महिलांच्या गर्दीचा फायदा घेत दागिने चोरी केल्याची कबुली दिली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे
- पुनम आतिष हातवळणे (वय २९)
- राधी हीरा हातवळणे (वय ४०)
- शन्नू राजू हातवळणे (वय ५०)
- महेश दिनाजी गायवाड (वय ३८, तृतीय पंथी)
(सर्व रा. शांतीनगर इंदिरा, नांदेड)
या आरोपींकडून मिळालेला मुद्देमाल जप्त करून त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस स्टेशन मुदखेड येथे हजर करण्यात आले आहे. संबंधित चोरीप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांची पडताळणी करण्यात आली असून गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.












