नांदेड | १६ फेब्रुवारी प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड शहर व परिसरात मोटारसायकल चोरी, जबरी चोरी तसेच घरफोडीचे प्रकार वाढत असताना, स्थानिक गुन्हे शाखा नांदेड पोलिसांनी मोठी कारवाई करत शस्त्रासह धोकादायक टोळीचा पर्दाफाश केला आहे. विविध पोलीस ठाण्यांतील एकूण ६ गुन्ह्यांत गुंतलेल्या या टोळीतील ३ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून तब्बल २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई १५ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहरातील हॉटेल चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना, गोपनीय माहितीच्या आधारे संशयित इसमांवर नजर ठेवण्यात आली. दोन विनानंबर मोटारसायकलवर फिरणारे तीन संशयित इसम चोरीचा माल विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी नांदेड शहरातील विविध भागांत मोटारसायकल चोरी, जबरी चोरी व घरफोडी केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून २ सोन्याचे दागिने (२७ ग्रॅम – किंमत १ लाख ८० हजार रुपये), २ मोटारसायकली (७० हजार रुपये), २ मोबाईल (१५ हजार रुपये) तसेच १ गावठी पिस्तूल व एक लोखंडी खंजीर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय विनापरवाना बाळगलेले शस्त्रही आढळून आल्याने संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात विमानतळ, भाग्यनगर व हदगाव पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांची उकल झाली असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही यशस्वी कारवाई पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि उदय खंडेराय केली आहे.
नांदेड पोलिसांच्या या ठोस कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असून, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट झाली आहे.












