प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड, दि. २ मार्च
गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेला अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या छापा कारवाईत रेती वाहतुक करणाऱ्या टिप्परसह १२ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकार चिंचोलकर आणि त्यांच्या पथकाने वाजेगाव ते आलू कांदा बोंडार रस्त्यावर गस्त घालत असताना संशयित टिप्पर पकडला. या वाहनात अंदाजे तीन ब्रास रेती (वाळू) भरलेली होती.
वाहन क्र. MH 26 AD 1264 असलेल्या या टिप्परची तपासणी करण्यात आली असता, चालक ज्ञानेश्वर जळवा जाधव (वय ३६, रा. वांगी, नांदेड) याच्याकडे रेती वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे आढळून आले. चौकशीत वाहनाचा मालक ज्ञानेश्वर शेषेराव पुयड (रा. पुणेगाव, नांदेड) असल्याचे निष्पन्न झाले. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी याप्रकरणी १२ लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि १५ हजार रुपये किमतीची रेती असा एकूण १२,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२), ३(५) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४८(७) आणि ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे (इतवारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम, पोलीस हवालदार भोसले, चालक पोलीस कॉन्स्टेबल माधव मारवाडे यांचा समावेश होता.
पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी या कारवाईत सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. नांदेड ग्रामीण भागात अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर पोलिसांची ही कारवाई सुरूच राहील, असे जनसंपर्क अधिकाऱ्याने कळविले आहे.












