नायगाव (प्रतिनिधी) १ एप्रिल
नांदेड जिल्ह्यामध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली आहे. याच मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून दोन तरुणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ३० हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
नांदेडचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील अवैध शस्त्रधारकांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. या आदेशानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड व त्यांचे पथक ३१ मार्च रोजी नरसी फाटा परिसरात गस्त घालत होते.
गस्तीदरम्यान, नरसी ते मुखेड जाणारे रोडवरील कंडाळा फाटा येथे काही तरुण अवैध गावठी पिस्तूल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने कंडाळा फाटा येथे छापा टाकला.
दोघे अटकेत, शस्त्र जप्त
पोलिसांनी संशयावरून दोन तरुणांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे ३०,००० रुपये किमतीचे एक गावठी पिस्तूल मिळून आले. पोलिसांनी तात्काळ सदर शस्त्र जप्त करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
अटकेतील आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रल्हाद ऊर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी तम्मा, ता. नायगाव)
२. रवि धोंडीबा देवकांबळे (वय २१ वर्ष, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव)
गुन्हा दाखल
या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
यांनी केली कारवाई:
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक (भोकर) अर्चना पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक (नांदेड) सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, उपनिरीक्षक साईनाथ पुयड, पोलीस अंमलदार बालाजी कदम, इम्रान शेख, प्रमोद जोधळे, संदीप घोगरे, अमोल घेवारे आणि सायबर सेलचे राजू सिटीकर व दीपक ओढणे यांनी केली आहे.
या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
वृत्तलेखन
माधव वाघमारे प्रतिनिधी












