नांदेड ११ एप्रिल (प्रतिनिधी, माधव वाघमारे)
स्त्री शिक्षणाचे जनक आणि थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (दि. ११) शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी १०.०० वाजता औद्योगिक प्रशिक्षण केंद्राजवळील (ITI) महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर सौ. कविता संतोष मुळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार अशोकराव चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबतच भोकर मतदारसंघाच्या आमदार श्रीजया चव्हाण, उपमहापौर दिलकसिंग रावत, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, महिला व बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील आणि भाजपा महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर यांनीही महात्मा फुले यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापुरुषांचे विचार समाजाला दिशादर्शक
या प्रसंगी बोलताना मान्यवरांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडी करून समाजात समतेचा विचार रुजवला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दिलेला लढा आणि त्यांचे सत्यशोधक विचार समाजाला आजही योग्य दिशा देणारे आहेत, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती
या अभिवादन कार्यक्रमास महानगरपालिकेतील विविध प्रभागांचे नगरसेवक, विविध विभागांचे मुख्य अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या संख्येने अनुयायी व नागरिकांनी गर्दी केली होती.












