नांदेड २२ एप्रिल प्रतिनिधी
नांदेड ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन क्रॅक डाऊन’ अंतर्गत मोठी कारवाई करत तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात अवैध रित्या वाहतूक केला जाणारा लाखो रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण १७ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून १३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याभरात अवैध धंद्यांविरुद्ध मोहीम राबवली जात आहे. याच दरम्यान, २२ एप्रिल २०२६ रोजी पहाटे २:१० वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस चंदासिंग कॉर्नर येथे नाकाबंदी करत असताना देगलूरकडून नांदेडकडे येणारी एक पांढऱ्या रंगाची मारुती डिझायर कार (क्र. TS09UC-6085) संशयास्पद रित्या येताना दिसली. पोलिसांनी ही कार थांबवून तिची झडती घेतली असता, कारच्या डिक्कीमध्ये खाकी रंगाच्या चिकट टेपने गुंडाळलेले ११ बॉक्स आढळले. या बॉक्समध्ये २२ किलो गांजा आढळून आला.
जप्त केलेला मुद्देमाल:
- गांजा: ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा २२ किलो हिरवा पाला (गांजा).
- वाहन: ९ लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी डिझायर कार.
- एकूण किंमत: १३ लाख ४० हजार रुपये.
आरोपींची साखळी आणि अटक:
कारमधील मुख्य आरोपी अकबर अहमद खाँ पठाण (रा. क्रांतीनगर, अंबाजोगाई) याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, हा माल माधव विठ्ठल जाधव (रा. धर्मापुरी तांडा, ता. कंधार) याने बोधन (तेलंगणा) येथून दिल्याचे समोर आले. हा गांजा नांदेडमधील विविध एजंटना पोहोचवला जाणार होता.
या प्रकरणात पोलिसांनी एकूण १७ जणांना आरोपी केले आहे. यामध्ये अंबाजोगाई, कंधार आणि नांदेडमधील विविध भागातील आरोपींचा समावेश आहे. सध्या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित १५ आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या पथकाने केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, बापुराव चव्हाण, ज्ञानेश्वर मतवाड आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांचा समावेश होता.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
वृत्त संकलन
प्रतिनिधी माधव वाघमारे












