नांदेड ६ जून ( प्रतिनिधी, माधव वाघमारे)
ग्लोबल वॉर्मिंगच्या वाढत्या संकटामुळे शहराचे वाढलेले तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि भावी पिढीला शुद्ध हवा मिळवून देण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, वृक्षमित्र फाउंडेशन व शहरातील विविध सामाजिक संस्थांनी एकत्र येत ‘हरित नांदेड’ अभियानाचा विडा उचलला आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मनपाच्या विसावा उद्यान येथे वृक्षारोपण करून या व्यापक अभियानाची अत्यंत उत्साहात सुरुवात करण्यात आली.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून महानगरपालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. त्यांच्याच संकल्पनेतून या नाविन्यपूर्ण अभियानाची आखणी करण्यात आली आहे.
यंदाच्या मान्सूनमध्ये १८,००० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
नांदेड महानगरपालिका आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मागील आठ वर्षांपासून लोकसहभागातून वृक्ष लागवड व संगोपनाचे कार्य अविरतपणे सुरू आहे. याच कार्याचा पुढील टप्पा म्हणून, सन २०२६ च्या मान्सून हंगामात मनपा हद्दीत एकूण १८,००० वृक्षांची लागवड केली जाणार आहे. ५ जून रोजी विसावा उद्यान येथे प्रातिनिधीक स्वरूपात वृक्षारोपण करून या अभियानाचा यशस्वी श्रीगणेशा करण्यात आला.
झाडे नुसती लावणार नाही, तर जगवणार!
केवळ वृक्षारोपण करून न थांबता, लावलेली झाडे १००% जगवण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक संघटनांच्या माध्यमातून ट्री गार्ड (Tree Guard), ठिबक सिंचन (Drip Irrigation) आणि तार फेंसिंग (Wire Fencing) यांसारख्या आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या जाणार आहेत.पालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांचे आवाहन
याप्रसंगी नागरिकांना आवाहन करताना मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे म्हणाले,
“आजच्या काळात शहराचे तापमान नियंत्रित ठेवणे ही फार मोठी गरज बनली आहे. प्रत्येक नागरिकाने आपल्या घरात किंवा परिसरात किमान एक तरी झाड लावून त्याचे केवळ रोपणच नाही, तर दत्तक घेऊन संगोपन करावे. नांदेडला सुंदर, स्वच्छ आणि हरित बनवण्यासाठी सर्वांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”विविध संस्थांची वज्रमूठ: शहरात व्यापक चळवळ
नांदेड शहराचे पर्यावरण राखण्यासाठी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर सामाजिक संस्था एकत्र आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्था सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत:
- धार्मिक व सेवाभावी संस्था: गुरुद्वारा लंबर साहेब, ब्रम्हाकुमारीज वसंतनगर, मेथेडिस्ट मेन्स-मेथेडिस्ट चर्च, श्री दत्तकृपा बहु. सेवाभावी संस्था वाघाळा.
- पर्यावरण व सामाजिक संघटना: वृक्षमित्र फाउंडेशन, रोटरी क्लब, गोदावरी नदी संसद, मातृभूमी सेवा संघ (नांदेड), ऑल इंडिया रिन्युवेबल एनर्जी असोसिएशन.
- व्यापारी व व्यावसायिक संस्था: नांदेड जनरल ट्रेडर्स असोसिएशन, अग्रवाल महिला मंडळ, आर के बिल्डर्स अँड डेव्हलपर्स.
- शैक्षणिक व इतर संस्था: ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल, फिंगर प्रिंट प्री-स्कूल, वैश्य शिक्षक व कर्मचारी महासंघ, चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठान, नंदगिरी किल्ल्याचे किल्लेदार, मातोश्री जनाई बहुउद्देशी सेवाभावी संस्था (येळेगाव).
पर्यावरण संवर्धनाची शपथ आणि मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाची सुरुवात उद्यान अधीक्षक डॉ. मिर्झा फरहतुल्ला बेग यांनी प्रास्ताविकातून केली. त्यांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. यानंतर ब्रम्हाकुमारी स्वाती बहेनजी यांनी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ दिली. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन वृक्षमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष मुगटकर यांनी केले.
या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख मान्यवर:
अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकंवार, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, क्षेत्रीय अधिकारी रमेश चवरे, रावण सोनसळे, राजेश जाधव, गौतम कवडे, निलावती डावरे यांच्यासह वृक्षमित्र फाउंडेशनचे सतीश कुलकर्णी, शैलेंद्र क्षिरसागर, नरेश यन्नावार, रवी रणखांब, कैलास अमिलकंठवार, प्रितम भराडिया आणि शहरातील बहुसंख्य पर्यावरणप्रेमी नागरिक, संस्था प्रतिनिधी व मनपा कर्मचारी उपस्थित होते.












