प्रतिनिधी, माधव वाघमारे
नांदेड, ८ जून २०२६
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागृती निर्माण करण्यासाठी आणि एक निकोप समाज घडवण्यासाठी जिल्हा परिषदेने सुरू केलेला ‘आरोग्यदूत’ हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. शालेय विद्यार्थी हे केवळ शिकणार नाहीत, तर ते स्वतः ‘आरोग्यदूत’ बनून गावागावांमध्ये आरोग्याची नवी पहाट आणतील आणि ग्रामीण भागाचा कायापालट करतील, असा ठाम विश्वास जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज येथे व्यक्त केला.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नांदेड येथील शंकरराव चव्हाण सभागृहात आयोजित ‘आरोग्यदूत प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या’ उद्घाटनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.
‘आरोग्यदूत’ ही लोकचळवळ ठरेल
आपल्या भाषणात पुढे बोलताना जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की, “ग्रामीण भागात आजही अनेक नागरिक किरकोळ आजारांवर योग्य वैद्यकीय उपचार घेण्याऐवजी अंगावर दुखणे काढण्याचा प्रयत्न करतात. योग्य माहितीअभावी आजार बळावण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्याविषयी प्राथमिक माहिती देणारी ‘आरोग्यदूत’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ही केवळ एक शासकीय योजना नसून, जिल्ह्यात आरोग्यसंपन्न समाज घडविण्यासाठी ती एक प्रभावी लोकचळवळ ठरेल.”
तसेच, उपस्थित प्रशिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ आरोग्यापुरते मर्यादित न ठेवता कृषी, पशुसंवर्धन, स्वच्छता आणि पोषण आहार याविषयीही सर्वसमावेशक माहिती द्यावी, जेणेकरून हे प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या कुटुंबात आणि गावात खऱ्या अर्थाने मार्गदर्शकाची भूमिका पार पाडू शकतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आरोग्यदूत उपक्रमातून वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना: मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली
ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्यविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, आरोग्याबाबतचे गैरसमज दूर व्हावेत आणि समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या उद्देशाने जिल्ह्यात आरोग्यदूत उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी दिली.
गावपातळीवर आरोग्यविषयक जनजागृती, मार्गदर्शन आणि लोकसहभाग वाढविण्यावर या उपक्रमाचा भर असेल. आरोग्यदूतांच्या माध्यमातून विविध आजारांची प्राथमिक माहिती, प्रतिबंधात्मक उपाययोजना, स्वच्छतेचे महत्त्व, पोषण, पशू व मानव आरोग्याशी संबंधित बाबी तसेच अपघात व आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले जाईल. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ, डॉक्टर आणि विविध विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम प्रभावीपणे राबवून विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आरोग्याची व्यापक चळवळ उभी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी विद्यार्थी व प्रशिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त अशा तयार करण्यात आलेल्या ‘आरोग्यदूत’ या दोन मार्गदर्शक पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे व मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे यांनी उपस्थित उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण कार्यशाळेत विविध विभागांच्या प्रमुखांनी सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले:
- शिक्षण विषयक मार्गदर्शन: शिक्षणाधिकारी माधव सलगर
- कृषी विषयक मार्गदर्शन: कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे
- पशुसंवर्धन विषयक मार्गदर्शन: सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले
- आरोग्य विषयक मार्गदर्शन: जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. संतोष नवले
मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती
या दिमाखदार सोहळ्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सागर, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त एस. बी. खुणे, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. प्रवीणकुमार घुले, डॉ. राजाभाऊ गुट्टे, डॉ. संतोष नवले, डॉ. शिवशक्ती पवार, डॉ. सलमा हिराणी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी अवधूत गंजेवार, मुख्यमंत्री फेलो भार्गवी मुंढे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्यवहारे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रेणुका दराडे यांनी मानले.
या कार्यशाळेस जिल्ह्यातील तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद सलीम, सुभाष खाकरे तसेच आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.












