नांदेड १८ जून प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट’ अंतर्गत जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेला बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दरोड्याच्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय होती?
३० मार्च २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेच्या सुमारास, जुना मोंढा नांदेड येथील ‘माँ आरबुंदा ट्रेडींग ऑफिस’ या आडत दुकानात तीन अनोळखी इसम घुसले. त्यांनी दुकानात काम करणारे शिवहार पत्रावाळे यांना खंजरचा (सुरा) धाक दाखवला आणि ऑफिसमधील तब्बल १०,५०,०००/- (दहा लाख पन्नास हजार) रुपये असलेली बॅग जबरीने चोरून नेली. या प्रकरणी तक्रारदार सोहनलाल मोतीलालजी परमार (रा. जालना) यांच्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १३९/२०२६ कलम ३१०(२), ३०९(४), ३(५) भा.न्या.सं. सह कलम ४/२५ भा.ह.का. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अशी झाली अटक
या दरोड्याच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी निखिल संभाजी वाठोरे (वय १९ वर्षे, रा. सुमेध नगर, नांदेड) हा मागील अडीच महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. १८ जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि महेश कोरे व त्यांच्या टीमला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, हा आरोपी वजिराबाद हद्दीतील जुना मोंढा परिसराजवळ असलेल्या ‘शेतकरी पुतळा’ पूर्णा रोड येथे थांबलेला आहे.
माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ शेतकरी पुतळा परिसरात सापळा रचून आरोपी निखिल वाठोरे याला ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पुढील कारवाईसाठी आरोपीला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार (IPS), अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) श्री. सुरज गुरव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तसेच प्रत्यक्ष कारवाईत एल.सी.बी.चे पोउपनि महेश कोरे, पोलीस अंमलदार सुनील गटलेवार, माधव माने, श्रीराम दासरे आणि मनोज राठोड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी पथकातील सर्व अधिकारी व अंमलदारांचे कौतुक केले आहे.
विशेष रिपोर्ट
प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड.












