नांदेड २ जुलै (प्रतिनिधी – माधव वाघमारे)
जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पुकारलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या थेट मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अंमली पदार्थ तस्करीविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ५० किलो ६३० ग्रॅम वजनाचा पॉपी स्ट्रॉ (बोंडे तुकडे) हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेली वाहने व अंमली पदार्थांसह एकूण १५ लाख ९ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
साईबाबा मंदिर परिसरात रचला सापळा पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दि. ३० जून २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका अत्यंत गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, गुजरात राज्यातील नोंदणी क्रमांक GJ-10-CN-3070 असलेली एक क्रिएटा कार अंमली पदार्थांची मोठी खेप घेऊन विक्रीसाठी नांदेड शहरात येत आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने तात्काळ हालचाली करत पंचांसह जुना कौठा परिसरातील साईबाबा मंदिर परिसरात सापळा रचला. संशयास्पद कार येताच पोलिसांनी तिला वेढा घालून थांबवले आणि तपासणी सुरू केली.
दोन आरोपी गजाआड, गाड्याही जप्त वाहनाची सखोल झडती घेतली असता, पोलिसांना गाडीत लपवून ठेवलेला तब्बल ५० किलो ६३० ग्रॅम वजनाचा पॉपी स्ट्रॉ (बोंडे तुकडे) हा अंमली पदार्थांचा साठा मिळून आला. पोलिसांनी तात्काळ वाहनातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. प्रीतसिंग रामसिंग पुजारी (वय २३ वर्षे, रा. गुरुद्वारा गेट क्र. ४, नांदेड)
२. शामला चिंतामणी पोहरे (वय ४५ वर्षे, रा. चिखलवाडी, गुरुद्वारा गेट क्र. २, नांदेड)
पोलिसांनी या गुन्ह्यात वापरलेली अर्टिगा कार आणि एक दुचाकी (MH-26-BS-2006) देखील जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत १५,०९,४५०/- रुपये एवढी आहे.
मध्य प्रदेश कनेक्शन उघड, मुख्य पुरवठादार फरार! पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत या तस्करीचे आंतरराज्यीय धागेदोरे समोर आले आहेत. जप्त केलेला हा अंमली पदार्थांचा साठा मध्य प्रदेश राज्यातील नीमच जिल्ह्यातील ‘गौरीशंकर राजुलाला मालवी’ (रा. मोदी) व ‘धनराज दनगर’ (रा. राममोडी) या आरोपींकडून खरेदी करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. सध्या हे दोन्ही मुख्य पुरवठादार फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
या पथकाने केली कामगिरी सदरची यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सूरज गुरव, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री. अतुल भोसले यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल घोगरे, पोलीस अंमलदार सुनील गंटलेवार, शितल साळुंके, राजीव बोधगिरे, साहेबराव कदम, गणेश यादव व गोविंद राठोड यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
नांदेड जिल्हा पोलिसांतर्फे अवैध अंमली पदार्थ, शस्त्रे, जुगार, अवैध दारू आणि वाळू तस्करीविरोधात अशीच कडक कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.












