नांदेड १७ जुलै ( प्रतिनिधी माधव वाघमारे)
स्वराज्याचे सरसेनापती वीररत्न नेताजी पालकर यांच्या तामसा (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील समाधीस्थळी उच्च दर्जाचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा आरक्षणाचे अभ्यासक तथा ‘छावा’ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, मराठासेवक किशोरभाऊ चव्हाण हे आज, १६ जुलैपासून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत. या आंदोलनामुळे जिल्ह्यात शिवप्रेमी आणि मराठा समाज बांधवांमध्ये मोठा संताप उसळला असून, आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी उद्या, १७ जुलै रोजी भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
छत्रपतींचा वारसा जपण्यासाठी लढा
छत्रपती शिवाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास आणि त्यांचा भव्य वारसा येणाऱ्या पिढ्यांना ‘याचि देही याचि डोळा’ पाहता यावा, अनुभवता यावा यासाठी शिवरायांचे सरसेनापती आणि मावळ्यांच्या स्मारकांचा जीर्णोद्धार होणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे या ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था होत असल्याने, आता शासनाला जागे करण्यासाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
उद्या मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार
किशोरभाऊ चव्हाण यांच्या या बेमुदत उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आणि शासनाला मागण्या मान्य करण्यास भाग पाडण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे.
आंदोलनाची रुपरेषा:
- दिनांक: १७ जुलै २०२६
- वार: शुक्रवार
- वेळ: सकाळी १०:३० वाजता
- स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय समोर, नांदेड.
उपस्थित राहण्याचे आवाहन
हा लढा केवळ एका स्मारकाचा नसून आपल्या गौरवशाली इतिहासाचा आणि स्वाभिमानाचा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व शिवप्रेमी, मावळे आणि सकल मराठा समाजातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले कर्तव्य पार पाडावे व या आंदोलनाला जाहीर पाठिंबा द्यावा,” असे आवाहन विनीत सकल मराठा समाज, नांदेड यांच्या वतीने करण्यात आले आहे.
शासनाने तात्काळ या मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.












