नांदेड १९ जुलै रविवार २०२६
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने धडक कारवाई करत अवैध रेती वाहतूक करणारा टिपर आणि रेती असा एकूण ५,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
गस्तीदरम्यान गुरुजी चौकात संशयास्पद टिपर अडवला
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १८/०७/२०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत पेट्रोलींग करत होते. दरम्यान, गुरुजी चौक येथे सार्वजनिक रस्त्यावरून एक टिपर येत असताना पोलिसांना दिसला. पथकाने सतर्कता दाखवत सदर टिपर चालकास थांबण्याचा इशारा केला.
चालकाला थांबवून वाहनाची सखोल चौकशी व तपासणी केली असता, टिपरमध्ये अंदाजे अडीच ब्रास रेती बेकायदेशीरपणे वाहून नेली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी चालकाकडे रेती वाहतुकीचा आवश्यक परवाना व कागदपत्रांची मागणी केली, मात्र तो कोणताही वैध कागदपत्र सादर करू शकला नाही.
५ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी अटकेत
कागदपत्रे नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तत्काळ वाहन आणि रेती जप्त केली. यामध्ये ५,५०,०००/- रुपये किमतीचा टाटा कंपनीचा टिपर (क्रमांक MH-43-Y-6390) आणि १५,०००/- रुपये किमतीची अडीच ब्रास रेती असा एकूण ५,६५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी वाहन चालक आकाश प्रकाश घोडे (वय ३१ वर्षे, व्यवसाय: चालक, रा. शेलगाव, ता. अर्धापूर, जि. नांदेड, ह.मु. गवळे यांचे घरी भाड्याने, नालंदा नगर, नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुरन ३८३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) सह कलम ४८(७),(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भाग्यनगर पोलीस करत आहेत.
या पथकाने केली कारवाई
सदर यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संतोष तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) महेश माळी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेश वाडेवाले, पोलीस उपनिरीक्षक विनोद देशमुख, तसेच पोलीस अंमलदार विशाल माळवे, अदनान पठाण, विष्णुकान्त मुंडे, राजीव घुले, राहुल लाठकर, नागनाथ चापके, सुधाकर मरडोडे आणि अंकुश कांबळे (सर्व नेमणूक पो. स्टे. भाग्यनगर, नांदेड) यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे












