प्रतिनिधी २४ सप्टेंबर माधव वाघमारे (नांदेड)
नांदेड जिल्ह्यात मालमत्तेविरुद्ध तसेच शारीरिक स्वरूपाचे गुन्हे रोखणे, सराईत गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे मोठी कारवाई करण्यात आली आहे. मा. डॉ. नीलाभ रोहन, पोलीस अधीक्षक, नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेपासून ते २४ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ३.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात विशेष “कॉम्बींग ऑपरेशन” राबविण्यात आले.
या विशेष मोहिमेदरम्यान सराईत गुन्हेगार, अवैध शस्त्र बाळगणारे व्यक्ती, तडीपार व्यक्ती, हिस्ट्रीशीटर तसेच पाहिजे व फरारी आरोपी यांची कसून पडताळणी करण्यात आली. संशयित व्यक्ती, गुन्हेगारांच्या हालचाली आणि त्यांच्या वास्तवाच्या ठिकाणांची तपासणी करून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.
कारवाईची ठळक वैशिष्ट्ये आणि आकडेवारी:
- सहभागी अधिकारी: ५५
- सहभागी अंमलदार: १९२
- तडीपार/प्रस्तावित गुन्हेगार तपासणी: २३
- MPDA अंतर्गत सुटलेले गुन्हेगार तपासणी: २७
- शरीराविरुद्धचे सराईत गुन्हेगार तपासणी: ६९
- कलम १२२, मपोका अन्वये दाखल गुन्हे: ०२
- वैध/अवैध शस्त्र बाळगणारे व संशयित (शस्त्र अधिनियम): ०१ गुन्हा (नांदेड ग्रामीण)
- जामीनपात्र वॉरंट (BW) बजावणी: २७
- अजामीनपात्र वॉरंट (NBW) बजावणी: १९
- समन्स बजावणी: ४२
अवैध शस्त्र व मपोका अंतर्गत दाखल गुन्हे: कॉम्बींग ऑपरेशनदरम्यान शस्त्र बाळगणाऱ्या तसेच संशयास्पद स्थितीत फिरणाऱ्या इसमाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये आणि शस्त्र अधिनियमांन्वये एकूण ०३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत: १. भागानगर पोलीस स्टेशन: कलम ५४८/२०२६, कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा – ०२ आरोपी २. विमानतळ पोलीस स्टेशन: कलम ४८०/२०२६, कलम १२२ महाराष्ट्र पोलीस कायदा – ०१ आरोपी ३. नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन: कलम १२४७/२०२६, ४/२५ शस्त्र अधिनियम – ०१ आरोपी
पोलिसांची उच्चस्तरीय उपस्थिती व सहभाग: सदर विशेष मोहिमेत मा. डॉ. नीलाभ रोहन (पोलिस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशाने श्रीमती अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक), मा. सुरज गुरुव (अपर पोलीस अधीक्षक), सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व दुय्यम अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील अधिकारी व अंमलदार तसेच RCP पथकाने सक्रिय सहभाग घेऊन व्यापक तपासणी व कारवाई केली.
नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सराईत गुन्हेगार, तडीपार/हद्दपार व्यक्ती, पाहिजे व फरारी आरोपी तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, जिल्ह्यात शांतता व सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे.











