लोहा नांदेड २७ जुलै/ प्रतिनिधी (माधव वाघमारे)
अति प्रभावित मेगा पाणलोट प्रकल्पांतर्गत लोहा तालुक्यातील नगारवाडी येथील प्रगतिशील शेतकरी विश्वनाथ जायभाये यांच्या एकात्मिक सेंद्रिय शेती प्रकल्पाला जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी जायभाये कुटुंबाने राबवलेल्या विविध सेंद्रिय व नैसर्गिक शेती उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. या भेटीदरम्यान ‘एक लक्ष बांबू लागवड’ उपक्रमांतर्गत शेतालगतच्या नाल्याच्या काठावर बांबूचे रोप लावून जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेशही दिला.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विलास नरवटे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपविभागीय जलसंधारण अधिकारी उत्तम गायकवाड, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, उपकृषी अधिकारी अनिल वडजे, हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पाचे प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रविण काटेवाढ, सरपंच सुधाकर जायभाये, उपसरपंच देवराव चव्हाण यांच्यासह कृषी, महसूल, ग्रामपंचायत आणि वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (WOTR) व अश्वमेध संस्थेचे पदाधिकारी व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शासकीय योजना अन् सेंद्रिय पद्धतीचा सुरेख संगम
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शेतातील विविध घटकांची प्रत्यक्ष पाहणी केली. यामध्ये भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत विकसित केलेली आंबा बाग, मनरेगाअंतर्गत उभारण्यात आलेली सिंचन विहीर आणि हाय इम्पॅक्ट मेगा वॉटरशेड प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या गांडूळखत (वर्मी कम्पोस्ट) युनिटचा समावेश होता. शासकीय योजनांचा योग्य वापर करून शाश्वत शेती कशी उभी करावी, याचा उत्तम वस्तूपाठ नगारवाडीत पाहायला मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.
फळबाग, भाजीपाला अन् फुलशेतीची समृद्धी
विश्वनाथ जायभाये यांनी आपल्या एकात्मिक शेती पद्धतीमध्ये विविधतेवर भर दिला आहे. त्यांच्या शेतात शेवगा, आंबा, जांभूळ, पेरू, चिंच, बोर, चिकू, आवळा, लिंबू, पपई आणि नारळ यांसारख्या फळपिकांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय काकडी, वांगे, टोमॅटो, मिरची अशा भाजीपाला पिकांचीही सेंद्रिय पद्धतीने लागवड केली जाते. झेंडूच्या फुलशेतीमध्ये आधुनिक व शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे.
जैविक निविष्ठांचे प्रात्यक्षिक व तंत्रज्ञान
भेटीदरम्यान शेतकरी विश्वनाथ जायभाये, त्यांच्या पत्नी जोती जायभाये आणि मुलगा रामन जायभाये यांनी स्वतः तयार केलेल्या सेंद्रिय निविष्ठांची माहिती दिली. शेणखत, गांडूळखत, जीवामृत, घनजीवामृत, बीजामृत, दशपर्णी अर्क, अग्निअस्त्र आणि ब्रह्मास्त्र यांसारख्या पूर्णतः नैसर्गिक घटकांचा वापर करून पिकांचे पोषण आणि कीड-रोगांपासून संरक्षण कसे केले जाते, याचे प्रात्यक्षिक त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. तसेच पीक फेरपालट, आंतरपीक पद्धती, सेंद्रिय आच्छादन (मल्चिंग) आणि पाण्याचा तुषार व ठिबकद्वारे कार्यक्षम वापर याविषयी सविस्तर माहिती दिली.
“सेंद्रिय शेती ही काळाची गरज!” — जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
“सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीमुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो, ज्यामुळे सूक्ष्मजीवांची साखळी मजबूत होऊन मातीची सुपीकता दीर्घकाळ टिकून राहते. रासायनिक खतांचा व औषधांचा वापर टळल्याने उत्पादन खर्चात मोठी बचत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच ग्राहकांना रासायनिक अवशेषमुक्त, आरोग्यदायी अन्नधान्य उपलब्ध करून देण्यासाठी सेंद्रिय शेती हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.”नगारवाडी येथील या उपक्रमामुळे परिसरातील इतर शेतकऱ्यांनाही सेंद्रिय व एकात्मिक शेतीकडे वळण्यासाठी मोठी प्रेरणा मिळाली असून या पाहणी प्रसंगी नगारवाडीतील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












