नांदेड २८ ऑगस्ट प्रतिनिधी
नांदेड शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाढते अतिक्रमण तसेच बेकायदेशीररीत्या करण्यात येणाऱ्या वाहन पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक नियमन मोहीम राबवण्यात आली.
दिनांक २७ ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस निरीक्षक शहर वाहतूक शाखा, वजीराबाद व पोलीस निरीक्षक वजीराबाद यांच्या नेतृत्वाखाली गुरुद्वारा चौक ते कलामंदिर ते पक्की चाळ ते तिरंगा चौक या प्रमुख मार्गांवर विशेष संयुक्त कारवाई करण्यात आली. या मोहिमेत शहर वाहतूक शाखा, पोलीस ठाणे वजीराबाद येथील अधिकारी व अंमलदार, आरसीपी (RCP) पथक तसेच नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे पथक प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
कारवाईदरम्यान रस्त्यालगत करण्यात आलेली अतिक्रणे हटवण्यात आली असून हातगाड्या, फळविक्रेते, टपऱ्या व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे इतर अडथळे दूर करण्यात आले. याशिवाय चुकीच्या पद्धतीने वाहन पार्किंग करणे आणि रहदारीस अडथळा निर्माण करणे याप्रकरणी ५२ जणांवर केसेस दाखल करून एकूण ४४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नागरिकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशा ठिकाणी वाहने उभी करू नयेत. पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये, ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. ही विशेष मोहीम यापुढेही नियमित सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
विशेष बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे












