नांदेड २८ ऑगस्ट (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील शरीराविरुद्ध व मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष शोधमोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत २०१० पासून फरार असलेल्या एका अट्टल आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
शेख इरफान उर्फ बंबय्या शेख साजिद (वय ३६ वर्ष, व्यवसाय – मजुरी, रा. डेली फार्म कमानीजवळ, सारंगपूर, निजामाबाद, तेलंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे रचला सापळा दिनांक २६ ऑगस्ट २०२६ रोजी एलसीबीचे पथक शहरात फरार आरोपींचा शोध घेत असताना, मुदखेड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी शेख इरफान हा खुदबेनगर चौकाजवळ थांबल्याची पक्की बातमी खबर्याकडून मिळाली. माहितीची खातरजमा करून सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) गोविंद खैरे व त्यांच्या पथकाने तत्काळ खुदबेनगर चौक परिसरात धाड टाकली.
चौकातील एका पानटपरीच्या बाजूला संशयितरीत्या उभा असलेला शेख इरफान पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, सतर्क पथकाने त्याला जागीच घेराव घालून ताब्यात घेतले.
मुदखेडसह वजिराबाद व भाग्यनगर ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल पोलीस ठाणे मुदखेड येथे संपर्क साधून माहिती घेतली असता, सदर आरोपी मुदखेड पो. ठा. गु.र.नं. ५३/२०१० (कलम ३९९, ४०२ भादंवि) मधील ‘उद्घोषित फरार आरोपी’ असल्याचे निष्पन्न झाले. याव्यतिरिक्त त्याच्याविरुद्ध इतर पोलीस ठाण्यांमध्येही गंभीर गुन्हे प्रलंबित असून त्याच्यावर नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) जारी करण्यात आले होते:
- वजिराबाद पोलीस ठाणे: गु.र.नं. २१५/२०१० (कलम ३९५, ५११ भादंवि)
- भाग्यनगर पोलीस ठाणे: गु.र.नं. २५३/२०११ (कलम ४५४, ३८०, ३४ भादंवि)
- भाग्यनगर पोलीस ठाणे: गु.र.नं. ९९/२०१२ (कलम ३९२, ४५२, ३४ भादंवि)
- भाग्यनगर पोलीस ठाणे: गु.र.नं. ६५/२०१३ (कलम ४५२, ३९४, ३४ भादंवि)
आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुदखेड पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
या पथकाने बजावली कामगिरी ही यशस्वी कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोविंद खैरे, मिलिंद नरबाग पोलीस अंमलदार विरा कालरा, ब्रह्मानंद लामतुरे, राजकुमार डोंगरे, उमर शेख, महेश बडगू आणि महिला अंमलदार अन्नुबी शेख यांच्या पथकाने पार पाडली.












