प्रतिनिधी ३ सप्टेंबर माधव वाघमारे
नांदेड शहरातील फुले मार्केट परिसरातील ‘वेलनेस स्पा’ (Wellness Spa) Center वर स्थानिक गुन्हे शाखा व अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाने संयुक्त छापा मारून मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या आंतरराज्यीय देहव्यापाराचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून ३ आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर स्पा मालक फरार झाला आहे.
बोगस ग्राहकाद्वारे रचला सापळा फुले मार्केट रस्त्यालगतच्या ‘वेलनेस स्पा’ सेंटरमध्ये अवैध देहव्यापार चालत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी पथक तयार केले. ०१ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास शासकीय पंचांसमक्ष एक बोगस ग्राहक (Dummy Customer) ठरवून त्याला ५०० रुपयांच्या चिन्हांकित नोटा देऊन स्पात पाठवण्यात आले. खात्री पटताच मिळलेल्या इशार्यावरून पोलीस पथकाने धाड टाकली.
परराज्यातील महिलांची सुटका छाप्यात नेपाळ, नागालँड, नवी दिल्ली, ठाणे व पुणे येथील एकूण ७ पीडित महिलांची सुटका करण्यात आली. त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आल्याचे समोर आले आहे.
कारवाईतील आरोपी व जप्त मुद्देमाल
- अटक आरोपी: १) हिफजुर रहमान आरिफ उद्दीन (वय २०, रा. होजाई, नगाव, आसाम – मॅनेजर), २) रहाज उद्दीन रफीक उद्दीन (वय २०, रा. होजाई, नगाव, आसाम), ३) याहीया अहमद अब्दुल वाहीद (वय १९, रा. होजाई, नगाव, आसाम).
- फरार आरोपी: संतोष बघे (स्पा मालक).
- जप्त मुद्देमाल: विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोकड व साहित्य असा एकूण ₹१,७१,९२०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गु.र.नं. ३८७/२०२६ नुसार अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम (PITA) चे कलम ४, ५, ६ सह भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १४३(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अतुल भोसले, पोनि राजेश पुरी, मपोउपनि अश्विनी गायकवाड, रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर आणि यशोदा केंद्रे यांच्या पथकाने पार पाडली.












