मुखेड ३ सप्टेंबर(विशेष प्रतिनिधी)
नांदेड अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड पोलिसांनी अवैध गांजा बाळगणाऱ्या व त्याची विक्री करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (पं.दे.) येथे टाकलेल्या छापा कारवाईत १ किलो ११५ ग्रॅम वाळलेला गांजा आणि १२५ ग्रॅम वजनाचे गांजाचे हिरवे रोपटे जप्त करण्यात आले असून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून मध्यरात्री धाड २ सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, उंद्री येथील सुधाकर संतुकराव वडजे (वय ३५ वर्ष) हा आपल्या घरी अवैध गांजा बाळगून त्याची विक्री करत आहे. या माहितीच्या आधारे नांदेड पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पद्धतीने कारवाईचे नियोजन करण्यात आले.
३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे ००:१५ वाजता शासकीय पंच, राजपत्रित अधिकारी, वजन काटा कर्मचारी व पोलीस पथकाने आरोपी सुधाकर वडजे याच्या घरावर छापा टाकला. घराच्या अंगणात तपासणी केली असता, तेथे वाळलेल्या गांजाचे शेंडे, चुरा आणि मातीमध्ये लावलेले गांजाचे हिरवे रोपटे आढळून आले.
मु मुद्देमाल आणि गुन्हा दाखल पोलीस पथकाने पंचांसमक्ष जप्त केलेल्या २५,००० रुपये किमतीच्या १ किलो ११५ ग्रॅम वाळलेल्या गांज्यासह १२५ ग्रॅमचे रोपटे असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी सुधाकर संतुकराव वडजे याच्याविरुद्ध पोलीस ठाणे मुखेड येथे गुन्हा क्र. ३१०/२०२६, एनडीपीएस अधिनियम कलम ८(क), २०(२)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक ही यशस्वी कामगिरी नांदेड पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर) व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव (नांदेड) यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी किरण पोपळघट, पोनि चिंताबर कामठेवाड, पोउपनि अभिजीत तुतुरवाड, पोउपनि म्हैसनवाड, तसेच पोलीस अंमलदार रविंद्र भुले, अमोल सुंडगे, प्रविण कुरे, विशाल आटकोरे, माधव मरगेवाड आणि महिला अंमलदार रिहाना शेख यांच्या पथकाने बजावली.
जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
– प्रतिनिधी माधव वाघमारे












