भोकर / ३ सप्टेंबर प्रतिनिधी (माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत भोकर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. भोकर तालुक्यातील मौजे मोघाळी येथे पत्राच्या शेडमध्ये सुरु असलेल्या ‘अंदर बाहेर’ या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा मारून पोलिसांनी ११ आरोपींना ताब्यात घेतले असून, एकूण २ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २ सप्टेंबर २०२६ रोजी भोकर पोलिसांच्या पथकाने मौजे मोघाळी येथील पत्राच्या शेडमध्ये धाड टाकली. या कारवाईदरम्यान नरसिंग अनंदा राचेवाड (वय ४०), दत्ताहरी संभाजी शिंदे (वय ३७), साहेबराव किशन पंतुलवाड (वय २७), भास्कर ब्रह्मदेव उपरवट (वय ४०, रा. देऊळगाव ता. पातुर जि. अकोला), पिराजी लक्ष्मण धोतरे (वय ४२, रा. चिंचाळा ता. भोकर), हर्षवर्धन उत्तम देवके (वय ३७), मोहन गंगाधर वाघमारे (वय ५०), आनंदा हणमंतराव सोळंके (वय ४६), पांडुरंग दिगांबर कदम (वय ४१), चांदू नागोराव शिंदे (वय ६५) आणि बालाजी उत्तमराव पवार (वय ४६, सर्व रा. मोघाळी ता. भोकर) हे बेकायदेशीर जुगार खेळताना रंगेहात आढळले.
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:
- रोख रक्कम: ₹१२,७००/-
- मोबाइल फोन: ६ विविध कंपन्यांचे मोबाइल (किंमत ₹१,०२,५००/-)
- वाहने: १ मोटारसायकल (किंमत ₹१,००,०००/-)
- इतर: बदक छाप पत्ते
याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ४६१/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक विश्वांबर पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर झाडे, तसेच पोलीस अंमलदार कंधारे, घुग्नुर, जिंकवाड, आरेवाड, एकुलवार आणि रुजकर (सर्व नेमणूक भोकर पोलीस ठाणे) यांच्या पथकाने पार पाडली.
नांदेड जिल्हा पोलिसांकडून अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही अवैध हालचालींची माहिती तात्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.












