देगलूर ३ सप्टेंबर(प्रतिनिधी)
नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत देगलूर पोलिसांनी धडक कारवाई करत बंदी घातलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री करणाऱ्या चार जणांवर कारवाई केली आहे. या कारवाईत ७ लाख ५८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त माहितीच्या आधारे टाकली रेड दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी देगलूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा परि. पोलीस उपअधिक्षक वैभव पडवळ यांना गोपनीय माहिती मिळाली होती. नरंगल रोडवरील मोहम्मद जाकेर शेख यांच्या घराच्या पाठीमागे मोकळ्या जागेत महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा वाहनांमध्ये भरून वाहतूक व विक्रीसाठी नेला जात असल्याचे समजताच पोलीस पथकाने पंचांसमक्ष तात्काळ छापा टाकला.
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ₹७,५८,६००/-): १) एटीऑस कार (MH-12 GZ 2345): किंमत रु. ५,००,०००/- व त्यात असलेला रु. २६,२६०/- चा गुटखा. २) ऑटो (MH-26 G 2298): किंमत रु. २,००,०००/- व त्यात असलेला रु. १७,८६०/- चा गुटखा. ३) नरेंद्र मिल्क डेअरी दुकान: हणमंत विठ्ठल घडके याच्या दुकानातून रु. ५,७००/- चा गुटखा. ४) पोत्यातील साठा: अशोक लक्ष्मण कोंडेवाड याच्या ताब्यातील पोत्यातून रु. ४,५८०/- चा गुटखा.
चार आरोपींवर गुन्हे दाखल या प्रकरणी खालील चार आरोपींविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे: १) सय्यद मसीयोदीन उर्फ बबलु सय्यद रियाझोदीन (वय २५ वर्षे, रा. घुमट बेस, देगलूर) २) शेख सलमान शेख जानी (वय २१ वर्षे, रा. घुमट बेस, देगलूर) ३) हणमंत विठ्ठल घडके (वय ५० वर्षे, रा. रोहिदास चौक, देगलूर) ४) अशोक लक्ष्मण कोंडेवाड (वय २८ वर्षे, रा. लाईन गल्ली, देगलूर)
आरोपींविरुद्ध देगलूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ४१३/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम २६, २७, २३, ३०(२)(३), ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथकाची कामगिरी ही कारवाई नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्री सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (देगलूर) श्री किरण पोपळघट, परि. पोलीस उपअधिक्षक तथा प्रभारी अधिकारी श्री वैभव पडवळ, मपोउपनि/ किरण बेंबडे, तसेच पोलीस अंमलदार चामलवाड आणि घुगे (सर्व नेमणूक देगलूर पोलीस ठाणे) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
– प्रतिनिधी माधव वाघमारे












