नांदेड ९ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे)
मराठा आरक्षणाचा संघर्ष एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन ठेपला असून, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात समाजाची अस्वस्थता आणि अभूतपूर्व एकजूट पाहायला मिळत आहे. अशा अत्यंत संवेदनशील काळात समाजाला एकात्म ठेवणे गरजेचे असताना, काही घटकांकडून पदांचा आणि ‘सकल मराठा समाज’ या पवित्र नावाचा वैयक्तिक व संघटनात्मक स्वार्थासाठी गैरवापर केला जात असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. “समन्वयकपदाच्या पाट्या मिरवण्यापेक्षा ‘मराठा सेवक’ हीच निष्ठेची खरी ओळख आहे,” असे परखड प्रतिपादन मराठा सेविका सुचिता जोगदंड वडजे यांनी केले आहे.
‘सकल मराठा समाज’ ही कोणाची जहागीर नाही सुचिता जोगदंड वडजे यांनी पत्रकाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या भूमिकेत नमूद केले आहे की, ‘सकल मराठा समाज’ ही कोणत्याही एका संघटनेची, राजकीय पक्षाची किंवा पदाधिकाऱ्याची खासगी मालमत्ता नाही. गावागावांतील तो सामान्य मराठा बांधव—ज्याला मुलांच्या शिक्षणाची, शेतीच्या उत्पन्नाची, रोजगाराची आणि घरखर्चाची चिंता आहे, तरीही तो समाजाच्या न्याय्य हक्कासाठी स्वतःचा वेळ, पैसा आणि श्रम देतो—तोच ‘सकल मराठा समाजाचा’ खरा चेहरा आहे. सकलच्या व्यासपीठावर येताना संघटनांची ओळख आणि राजकीय पक्षाचे जोडे बाहेर काढूनच यावे लागते.
निष्ठा स्वार्थानुसार बदलणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार सुरुवातीला एखाद्या नेतृत्वाच्या लोकप्रियतेचा आधार घेऊन स्वतःची ओळख निर्माण करायची आणि पद किंवा वैयक्तिक स्वार्थ साध्य न झाल्यास त्याच नेतृत्वाविरुद्ध अचानक भूमिका बदलायची, या सोयीस्कर राजकारणावर त्यांनी जोरदार प्रहार केला. “खरी निष्ठा ही अपेक्षापूर्तीनुसार बदलत नाही. वैयक्तिक नाराजीला ‘समाजाचा आवाज’ असा मुलामा देऊन समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचे हिशेब चुकता करणे समाजहिताचे नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
आर्थिक गैरव्यवहार आणि निधी संकलनावर तीव्र आक्षेप वर्षानुवर्षांच्या संघर्षातून, उपेक्षा आणि अपमानाचे घोट पचवून उभ्या राहिलेल्या ‘सकल मराठा समाज’ या सामूहिक आणि पवित्र नावाने कोणत्याही प्रकारचा निधी, वर्गणी किंवा आर्थिक मदत गोळा करणे पूर्णपणे चुकीचे आहे. या नावाने आर्थिक व्यवहार करून समाजाच्या विश्वासाला तडा देणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने वेळीच नाकारले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
‘मराठा सेवक’ हीच खरी ओळख! कोणत्याही प्रसिद्धीची हाव किंवा पदाची लालसा न ठेवता “समाजासाठी मी काय करू शकतो?” या एकाच भावनेने काम करणाऱ्या निःस्वार्थ मराठा सेवकांच्या पाठीशी समाजाने खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. पदाच्या पाट्यांना आणि मोठ्या दाव्यांना न भुलता, समाजाने आता प्रत्यक्ष काम, त्याग आणि निष्ठा पाहिली पाहिजे.
एकजूट मजबूत करण्याचे आवाहन “आजचा लढा गरजवंत मराठ्यांच्या हक्काचा, पुढच्या पिढीच्या भवितव्य आणि अस्तित्वाचा आहे. त्यामुळे एकमेकांचे पाय ओढण्याऐवजी एकमेकांचे हात बळकट करण्याची, वैयक्तिक अहंकाराऐवजी सामूहिक विचारांची आणि ‘सकल मराठा समाजाच्या’ नावाला कलंक लागू न देता मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला पूर्ण ताकदीने बळ देण्याची गरज आहे,” असे आवाहन शेवटी मराठा सेविका सुचिता जोगदंड वडजे यांनी नांदेड येथून केले आहे.












