नांदेड ९ सप्टेंबर प्रतिनिधी
जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती अबाधित राखण्यासाठी नांदेड पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत. पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टू प्लस योजने’अंतर्गत सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित करून त्यांच्यावर MPDA (एमपीडीए) कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची प्रभावी कारवाई करण्यात आली आहे.
स्थानबद्ध करण्यात आलेले गुन्हेगार:
- शेख जावेद उर्फ लड्या शेख रहमत (वय २२ वर्षे, रा. जामा मशिदीजवळ, विष्णुपुरी, नांदेड): याच्याविरुद्ध दरोडा, बेकायदेशीररीत्या अग्नीशास्त्र (हत्यारे) बाळगणे व त्यांची विक्री करणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.
- अजय भगवान जोगदंड (वय २५ वर्षे, रा. एन.डी.-४१, राहुलनगर, सिडको, नांदेड): याच्याविरुद्ध प्राणघातक हत्यारांनी दुखापत पोहोचवणे, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि बेकायदेशीर अग्नीशास्त्र बाळगणे असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
कारवाईची पार्श्वभूमी व प्रक्रिया: यापूर्वी विविध प्रतिबंधात्मक कारवाया करूनही या आरोपींच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने, लिंबगाव व नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध MPDA अंतर्गत स्थानबद्धतेचे प्रस्ताव सादर केले. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व प्रतिबंधक कारवाई सेलने कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तशी शिफारस केली.
त्यानुसार, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी मा. श्री. राहुल कर्डिले यांनी ८ सप्टेंबर २०२६ रोजी आदेश देऊन दोन्ही गुन्हेगारांना एका वर्षाच्या कालावधीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले असून, त्यांना ताब्यात घेऊन कारागृहात रवाना करण्यात आले आहे.
चालू वर्षातील १८ वी स्थानबद्धता: नांदेड पोलिसांनी सन २०२६ या चालू वर्षात आतापर्यंत एकूण १८ सराईत गुन्हेगारांवर MPDA कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची यशस्वी कारवाई केली आहे. याशिवाय १५० पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांवर विविध कायद्यांनुसार प्रतिबंधात्मक कारवाया प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
“सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या आणि वारंवार गंभीर गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध कठोर प्रतिबंधात्मक कारवाई सुरूच राहणार असून, सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल.नांदेड पोलीस प्रशासन
बातमी प्रतिनिधी: माधव वाघमारे












