बातमी प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड १० सप्टेंबर शहरातील अनैतिक मानवी व्यापारास आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत, उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा उपविभाग) प्रशांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसरेणी येथील एका घरात छुप्या मार्गाने चालवल्या जाणाऱ्या कुटनखान्याचा (वेश्या व्यवसाय) पर्दाफाश केला आहे.
बोगस ग्राहकाद्वारे कारवाईचे नियोजन ९ सप्टेंबर २०२६ रोजी वसरेणी परिसरातील एका पांढऱ्या रंगाच्या इमारतीत अवैध वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांची नियुक्ती करून बोगस ग्राहकामार्फत खात्री केली. बोगस ग्राहकाने लातूर फाटा येथे भेट देऊन संशयित ठिकाणी प्रवेश करताच पोलिसांनी छापा मारला.
२ पीडितांची सुटका आणि ४ आरोपींवर गुन्हा या कारवाईदरम्यान पोलिसांनी नांदेड व गुजरात येथील दोन पीडित महिलांची सुटका केली. महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या खालील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे:
- लक्ष्मीबाई संजय जाधव (वय ४८, रा. सुर्या नगर, पावडेवाडी)
- सचिन कसबे (हॉटेल मालक)
- अल्ताफ नबीसाब शेख (वय २४, रा. वडेपुरी, ता. लोहा)
- तुषार सुरेश बुध्देवाड (वय ३४, रा. सुनिल नगर, दुध डेअरी, नांदेड)
पोलिसांनी घटनास्थळावरून विविध कंपन्यांचे मोबाईल फोन, रोख रक्कम व साहित्य असा एकूण २०,९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
कायदेशीर कारवाई या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११६३/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम १४३(३), ३(५) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ४, ५ व ६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई करणारे पोलीस पथक ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे, पोलीस निरीक्षक अतुल भोसले (स्थानिक गुन्हे शाखा), पोउपनि अश्विनी गायकवाड (AHTU), तसेच पोलीस अंमलदार रितेश कुलथे, गणेश लोसरवार, ज्ञानोबा कवठेकर, संजय राठोड, मोरे, बोईनवाड, शेख आणि यशोदा केंद्र यांनी पार पाडली.
नागरिकांना आपल्या परिसरात अनैतिक मानवी व्यापार किंवा अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास तात्काळ डायल ११२ किंवा नांदेड पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.












