नांदेड १० सप्टेंबर जिल्ह्यात मालाविरुद्ध गुन्हे करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरफोडी व चोरीच्या घटनांचा तपास करत गुन्हे शोध पथकाने दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांतील रोख रक्कमेसह एक दुचाकी, असा एकूण ७९,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उघडकीस आलेले दोन गुन्हे:
- घरफोडी (गुन्हा क्र. ७३३/२०२६): १८ जून २०२६ रोजी फिर्यादी कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने घराचे व कपाटाचे कुलूप तोडून ५०,००० रुपयांची रोख रक्कम लांबवली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) व ३०५ अन्वये गुन्हा दाखल होता.
- दुकान फोडून चोरी (गुन्हा क्र. ११४९/२०२६): ६ ते ७ सप्टेंबर २०२६ दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडून २३,५०० रुपये व इतर साहित्य चोरी केले होते. याप्रकरणी BNS कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तांत्रिक तपासाद्वारे आरोपींना बेड्या: गुन्हे दाखल झाल्यानंतर नांदेड ग्रामीण गुन्हे शोध पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक पुरावे व गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्रावली. याप्रकरणी इरफान खान नसरत खान पठाण (वय २५ वर्षे) आणि अनुराग विठ्ठल पाटील (वय १८ वर्षे) (दोघे रा. वाजेगाव, नांदेड) यांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.
हस्तगत केलेला मुद्देमाल: पोलीस पथकाने आरोपींकडून गुन्ह्यातील ९,४०० रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली सुमारे ७०,००० रुपये किमतीची पल्सर मोटारसायकल असा एकूण ७९,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींचा इतर कोणत्याही चोरीच्या गुन्ह्यांत सहभाग आहे का, याचा पुढील तपास सुरू आहे.
तपास पथक: ही कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन यांच्या आदेशाने, पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि व्यंकट कुसमे, पोलीस अंमलदार विठ्ठल भिसे, गफार शेख, संतोष पवार, विष्णू कल्याणकर, भगवान टिपरसे, जीवन तेलंग (नांदेड ग्रामीण) व सायबर सेलचे राजेंद्र सिटीकर यांनी केली आहे.
प्रतिनिधी: माधव वाघमारे












