नांदेड १४ सप्टेंबर(प्रतिनिधी : माधव वाघमारे)
नांदेड जिल्हाभरातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्या सूचनेनुसार राबवल्या जाणाऱ्या ‘विशेष मोहिमे’अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीररीत्या विनापरवाना व्यावसायिक गॅस सिलेंडरची काळ्या बाजारात विक्री व वाहतूक करणाऱ्या एका इसमाला ताब्यात घेऊन तब्बल ८ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कोहिनूर मिल परिसरात धाडसी छापा १३ सप्टेंबर २०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक हद्दीत गस्त घालत असताना, उस्माननगर रस्त्यावरील कोहिनूर मिलच्या विरुद्ध बाजूस एका ‘छोटा हत्ती’ वाहनातून व्यावसायिक गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दुपारच्या सुमारास पंचांसमक्ष सापळा रचून छापा टाकला.
छाननीदरम्यान टाटा इंट्रा छोटा हत्ती (क्र. MH-26-CH-4677) या वाहनाची झाडाझडती घेतली असता, त्यात मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक वापराच्या गॅस टाक्या आढळून आल्या.
राजस्थानचा चालक पोलिसांच्या जाळ्यात वाहनातील चालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव श्यामलाल शंकरलाल सारन (वय ३२ वर्षे, मूळ रा. बोजासर, जि. फलोदी, राजस्थान; सध्या रा. शिवाजीनगर, मुखेड, ता. मुखेड, जि. नांदेड) असे सांगितले. चौकशीदरम्यान त्याने सदर गॅस टाक्या काळ्या बाजारात विक्री व रिफिलिंगसाठी आणल्याचे कबूल केले. या वाहतुकीबाबत त्याच्याकडे कोणताही परवाना किंवा कागदपत्रे नव्हती.
जप्त केलेला मुद्देमाल:
- टाटा इंट्रा छोटा हत्ती वाहन (MH-26-CH-4677): अंदाजे किंमत रु. ६,००,०००/-
- भरलेले व्यावसायिक गॅस सिलेंडर (५२ नग): अंदाजे किंमत रु. २,३४,०००/- (प्रत्येकी रु. ४,५००/-)
- एकूण जप्त मुद्देमाल: रु. ८,३४,०००/-
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल आरोपी श्यामलाल सारन याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११८९/२०२६, जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम ३, ७ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
कारवाई करणारी टीम सदर कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. निलाभ रोहन व अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या नेतृत्वात पोउपनि बी. ई. चव्हाण, पोलीस अंमलदार लक्ष्मण जाधव, जमीर आणि गुरुनाथ कारामुंगे यांच्या पथकाने केली आहे.












