नांदेड २१ सप्टेंबर (प्रतिनिधी माधव वाघमारे)
नांदेड जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस प्रशासनाने धडक मोहीम सुरू केली असून, शिवाजीनगर पोलिसांनी सावित्रीबाई फुलेनगर भागातील मोकळ्या जागेवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ५ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून रोख रक्कम, ५ स्मार्टफोन आणि ३ दुचाकी असा एकूण २ लाख १३ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रात्रीच्या गस्तीदरम्यान मिळाली गुप्त माहिती पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबवली जात आहे. दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री गस्त घालत असताना, सावित्रीबाई फुलेनगर येथील राहुल चिखलीकर यांच्या घराशेजारील मोकळ्या जागेत काही इसम ‘तिरट’ नावाचा जुगार खेळत व खेळवत असल्याची पक्की माहिती गुप्त बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पंचांसमक्ष घटनास्थळी धाड टाकून ५ जणांना रंगेहाथ पकडले.
अटक करण्यात आलेले आरोपी: १) शेख अन्वर शेख उमर (वय ४० वर्ष, रा. मस्तानपुरा, नांदेड) २) स्य्यद आजर स्य्यद बबू (वय ३६ वर्ष, रा. नोबेल कॉलनी, नांदेड) ३) अमोल मधुकर वने (वय ३६ वर्ष, रा. जयभीमनगर, नांदेड) ४) राहुल वामन चिखलीकर (वय ४२ वर्ष, रा. जयभीमनगर, नांदेड) ५) पठाण फिरोज पठाण सुलतान मियाँ (वय ४० वर्ष, रा. गोकुळनगर, नांदेड)
२.१३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून ₹३,०३० रोख रक्कम, ₹८९,००० किमतीचे ५ स्मार्टफोन, ₹१,२०,००० किमतीच्या ३ मोटारसायकल (MH-26-DD-0476, MH-26-AL-8049, MH-26-BM-4679) आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ₹२,१३,०३०/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
गुन्हा दाखल व पोलीस पथक या प्रकरणी पोउपनि/ सय्यद यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्र. ४१२/२०२६, कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या आदेशाने आणि पोलीस निरीक्षक राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आय. वाय. सय्यद, तसेच पोलीस अंमलदार कालो, काकडे, यमलवाड आणि बालाजी यादगिरवाड यांच्या पथकाने पार पाडली.
अवैध जुगार, मटका आणि इतर बेकायदेशीर प्रकारांविरुद्ध पोलीस कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, नागरिकांनी अशा प्रकारांची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे.












