छत्रपती संभाजीनगर ( प्रतिनिधी १४ ऑक्टोंबर- माधव वाघमारे) निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा आढावा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सोशल मीडिया, रील्स आणि व्हिडिओ जाहिरातींचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, हे व्हिडिओ तयार करण्यापासून त्यांना आवश्यक असणारे पूर्वप्रमाणन (Certification) मिळेपर्यंतची प्रक्रिया वेळखाऊ ठरू शकते. त्यामुळे उमेदवारांनी जाहिराती व व्हिडिओ तयार करतानाच भारत निवडणूक आयोगाच्या नियमांचे व निर्देशांचे कडक पालन करावे, असे स्पष्ट आवाहन ०५ – औरंगाबाद पदवीधर निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी केले आहे.
प्रतिबंधित बाबी आधीच टाळल्यास माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीकडून (MCMC) व्हिडिओंच्या पूर्वप्रमाणनाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल, असेही त्यांनी नमूद केले.
विविध माध्यमांसाठी पूर्वप्रमाणन बंधनकारक
उमेदवारांच्या प्रचारासाठी वृत्तपत्रांतील जाहिराती, प्रचाररथ, सोशल मीडिया रील्स, रेडिओ, एफएम वाहिनी, बल्क एसएमएस, व्हॉईस मेसेज आणि संकेतस्थळांवरील जाहिरातींचा वापर होतो. नियमानुसार, या सर्व जाहिराती प्रसारित करण्यापूर्वी ‘माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती’ (MCMC) कडून पूर्वप्रमाणन करून घेणे अनिवार्य आहे.
विशेषतः वृत्तपत्रांमधील जाहिरातींसाठी मतदानाच्या आधीच्या शेवटच्या दोन दिवसांत नियमानुसार पूर्वप्रमाणन घेणे आवश्यक आहे.
कार्यक्रम आणि जाहिरात संहितेचे पालन अनिवार्य
प्रचाराची सामग्री तयार करताना खालील कायदेशीर तरतुदी आणि संहितेचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे:
- सभ्यता व नैतिकता: अभिरुचीहीन, अश्लील, बदनामीकारक किंवा जाणीवपूर्वक दिलेली अर्धसत्य/चुकीची माहिती प्रसारित करू नये.
- सामाजिक व राष्ट्रीय सलोखा: धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारी, हिंसाचाराला प्रोत्साहन देणारी, कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणारी किंवा राष्ट्रविरोधी कृत्यांना खतपाणी घालणारी सामग्री वापरू नये.
- घटनात्मक संस्थांचा आदर: न्यायालयाचा अवमान करणारा, राष्ट्रपती किंवा न्यायपालिकेच्या सचोटीवर प्रश्न उपस्थित करणारा मजकूर पूर्णपणे वर्ज्य असावा.
- महिला व बालकांचा आदर: महिलांचे विकृत/अवमानकारक चित्रण, बालकांसंदर्भातील संहितेचे उल्लंघन किंवा अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीला प्रोत्साहन देणारी दृश्ये टाळावीत.
- प्रतीकांचा गैरवापर: स्वतःच्या फायद्यासाठी राज्यमुद्रा, राज्यघटनेतील तरतुदी, राष्ट्रीय नेते किंवा राज्यातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावांचा व प्रतिमांचा गैरवापर करू नये.
- प्रतिबंधित उत्पादने: सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि मादक पदार्थांच्या जाहिरातींवर पूर्ण बंदी आहे.
- सिनेमॅटोग्राफ कायदा: ‘सिनेमॅटोग्राफ कायदा, १९५२’ मधील तरतुदींचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी.
प्रचाराच्या व्हिडिऑंमध्ये ‘या’ १२ बाबी पूर्णपणे टाळाव्यात:
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व्हिडिओ जाहिरातींमध्ये पुढील गोष्टींचा समावेश करण्यास सक्त मनाई आहे:
- धार्मिक स्थळे: मंदिर, मशीद, गुरुद्वारा किंवा अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांची दृश्ये व चिन्हे वापरू नयेत.
- सकारात्मक प्रचार: इतर राजकीय पक्षांवर चिखलफेक करण्याऐवजी उमेदवाराने स्वतः केलेल्या कामांचा आढावा द्यावा.
- वैयक्तिक टीका नाही: कोणत्याही व्यक्तीच्या किंवा प्रतिस्पर्ध्याच्या खासगी आयुष्यावर आरोप करू नयेत तसेच असभ्य भाषा वापरू नये.
- आक्षेपार्ह वक्तव्ये: विरोधी पक्षांवर हेतुपुरस्सर व बिनबुडाचे आरोप टाळावेत.
- सैन्याचा वापर नाही: भारतीय सैन्य किंवा सैन्य अधिकाऱ्यांची छायाचित्रे प्रचारात वापरता येणार नाहीत.
- परराष्ट्र धोरण: इतर कोणत्याही मित्र किंवा परकीय देशाविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणी करू नये.
- जातीय/धार्मिक मजकूर: विशिष्ट जात, धर्म किंवा पंथाविरुद्ध द्वेष पसरवणारा मजकूर वापरू नये.
- मानहानी: कोणत्याही व्यक्तीची अवहेलना किंवा मानहानी करणारी दृश्ये व मजकूर टाळावा.
- न्यायालयाचा अवमान: न्यायव्यवस्थेचा अवमान होईल असे चित्रण करू नये.
- राष्ट्रीय एकात्मता: देशाचे सार्वभौमत्व आणि राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणारी सामग्री वर्ज्य आहे.
- वैयक्तिक नाव घेऊन आरोप: कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन तिच्यावर जाणीवपूर्वक आरोप करणे किंवा तिचा अपमान करणे टाळावे.
- प्रमाणन सुविधा: मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती (MCMC) स्थापन करण्यात आली आहे. उमेदवारांनी आपल्या जाहिराती व व्हिडिओ या समितीकडून प्रमाणित करून घ्यावेत.
विभागीय आयुक्तांचे आवाहन: आयोजकांनी व उमेदवारांनी ऐनवेळी होणारी धावपळ व कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी जाहिराती आणि व्हिडिओ तयार करतानाच निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.












