नांदेड ३० जुलै (प्रतिनिधी माधव वाघमारे)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नांदेड शहरात होणारे विविध कार्यक्रम, मिरवणुका व अन्य उपक्रम शांततापूर्ण, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावेत तसेच संपूर्ण जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित राहावी, या उद्देशाने पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘मंथन हॉल’ येथे शांतता समितीची विशेष बैठक पार पडली. सदर बैठक पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीस सूरज गुरव (अप्पर पोलीस अधीक्षक), रामेश्वर वंजने (उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड शहर), नांदेड शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, गिरीश कदम (अपर आयुक्त, नांदेड महानगरपालिका), समाजकल्याण अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. याशिवाय शांतता समितीचे सदस्य, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन
उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जयंती उत्सव सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याच्या वातावरणात साजरा करावा. कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यावी. मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियम, ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियम तसेच शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर; अफवा पसरवल्यास कडक कारवाई
बैठकीत उपस्थितांना सोशल मीडियाचा अतिशय जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. कोणत्याही प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह संदेश, धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे फोटो, व्हिडिओ अथवा पोस्ट प्रसारित किंवा फॉरवर्ड करू नयेत, असे सांगण्यात आले. अशा प्रकारचे कृत्य करून शांतता भंग करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला.
प्रशासनाकडून सूचनांची दखल
बैठकीदरम्यान उपस्थित शांतता समिती सदस्य व उत्सव मंडळांच्या प्रतिनिधींनी सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, मिरवणुकीचा मार्ग, पार्किंग व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींविषयी आपल्या महत्त्वाच्या सूचना मांडल्या. पोलीस प्रशासनाने या सर्व सूचनांची सकारात्मक दखल घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत.
शेवटी, नांदेड जिल्हा पोलिसांच्या वतीने सर्व नागरिकांना अण्णाभाऊ साठे जयंती शांततेत, सौहार्दपूर्ण वातावरणात आणि कायद्याचे पालन करून साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले.












