नांदेड २८ जून प्रतिनिधी
जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिसांनी एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. गोदावरी नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करणारी बोट, इंजिन आणि वाळूची अवैध वाहतूक करणारा हायवा पकडून पोलिसांनी तब्बल ७२ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी ५ आरोपींविरुद्ध २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गस्तीदरम्यान मिळाली गुप्त माहिती
दिनांक २७/०६/२०२६ रोजी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलींग करत होते. दरम्यान, त्यांना अवैध वाळू वाहतुकीबाबत खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा (क्र. MH28R7800) ताब्यात घेतला. चालकाकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने, दोन पंचांसमक्ष हायवा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.
गोदावरी घाटावर पोलिसांची धाड; बोट आणि इंजिन जप्त
या कारवाईपाठोपाठ पोलिसांनी गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावरही हल्लाबोल केला. नदी पात्रातून बेकायदेशीरपणे वाळू उपसा करण्यासाठी वापरली जाणारी बोट, इंजिन आणि तराफे पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केले. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ७८३/२०२६ आणि ७८४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२), ३(५) सहकलम ४८(७), ४८(८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पाच आरोपींवर गुन्हे दाखल
या धडक कारवाईत एकूण ०५ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये:
१) समाधान बाबासाहेब जाधव (रा. गोवर्धनघाट, नांदेड)
२) आदिनाथ मोरे (रा. भनगी)
३) तुकाराम मोरे (रा. भनगी)
यांच्यासह इतर दोन अनोळखी इसमांचा समावेश आहे.
या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली कारवाई
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक (भोकर) श्रीमती अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक (नांदेड) श्री. सुरज गुरव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (इतवारा, नांदेड) श्री. प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर, पोउपनि बाबूराव चव्हाण, पोउपनि व्यंकट कुसमे, तसेच पोलीस अंमलदार पोहेकॉ/६४८ पोहेकॉ/११७३ कानगुले, पोहेकॉ/९१६ भिसे, पोकॉ/४२७ जमीर आणि पोकॉ/१५०० सिरमलवार (सर्व नेमणूक पो.स्टे. नांदेड ग्रामीण) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
अवैध धंदेवाल्यांना पोलीस प्रशासनाचा इशारा
जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतूक, अवैध दारू, जुगार, गुटखा यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध भविष्यातही अशीच कठोर आणि प्रभावी मोहीम राबवली जाईल, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी: माधव वाघमारे, नांदेड












