नांदेड २६ जुलै प्रतिनिधी
नांदेड जिल्हा पोलीस दलाने जिल्हाभरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी, चोरी, फसवणूक, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि अवैध दारू विक्री विरोधात धडक कारवाया करत गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विविध ठिकाणी घडलेल्या प्रमुख घटनांचा सविस्तर आढावा खालीलप्रमाणे आहे:
१. ५१ लाखांपेक्षा जास्त रकमेची डिजिटल अटक व सायबर फसवणूक
सायबर सेल: जुना कौठा, बसवेश्वर नगर येथील ५६ वर्षीय मोहन लक्ष्मणराव घईणवाड यांना आरोपींनी डिजिटल अरेस्ट करण्याची भीती दाखवून तसेच मनी लाँड्रिंग व टेरर फंडिंगचे खोटे आरोप लावून एकूण ५१,३४,८५६ रुपयांचा अपहार करत गंडा घातला. सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि/वसंत सप्रे पुढील तपास करत आहेत.
२. पोलीस असल्याची बनावट ओळख दाखवून फसवणूक
नांदेड ग्रामीण: सिडको ते असरणी ओव्हर ब्रिजदरम्यान दोन अनोळखी इसमांनी पोलीस असल्याचे सांगून ६९ वर्षीय वृद्ध चंद्रकांत नक्कावार यांच्या हातातील ६५,००० रुपयांचे सोन्याचे दागिने काढून फसवणूक केली. पोलीस हवालदार/यालावार या प्रकरणाचा तपास करत आहेत.
३. घरफोडी व चोरीच्या घटना
- मुखेड: अशोकनगर येथे अज्ञात चोरट्याने घर फोडून २२,१४० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
- देगलूर: तोटावार गल्ली येथून १०,००० रुपयांची रोख रक्कम चोरट्याने लंपास केली. तसेच एस.बी.आय. बँक परिसरात मोटरसायकलच्या हँडलला लावलेल्या पिशवीतून १,५०,००० रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.
- अर्धापूर: मौजे दौर येथील शेतातील गोदामातून ७२,००० रुपये किमतीची १२ क्विंटल हळद चोरीला गेली.
- रामतीर्थ (नरसी): बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेऊन एका महिला फिर्यादीच्या गळ्यातील ३९,४०० रुपयांची सोन्याची पोत लंपास करण्यात आली.
४. कंधार येथे ४ बैल आणि पिंपळगाव येथे जुगार अड्ड्यावर कारवाई
- जनावर चोरी (कंधार): कुरुळा येथील शेतातील गोठ्यात बांधलेले ९५,००० रुपये किमतीचे ४ बैल चोरट्यांनी लांबवले.
- जुगार छापा (मांडवी): पिंपळगाव (ता. किनवट) येथे बेकायदेशीर ५२ पत्त्यांचा जुगार खेळणाऱ्यांवर छापा मारून ९०,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
५. अपघात, अवैध शस्त्र आणि दारूबंदी कारवाया
- भोकर-हिमायतनगर रस्ता अपघात (तामसा): पारवा फाटा येथे बोलेरो वाहनाच्या धडकेत ताहेर बेग (वय ४०) आणि शेख युनुस (वय ४०) या दोघांचा मृत्यू झाला.
- लोखंडी खंजर जप्त (इतवारा): चौफाळा परिसरातून गजानन हिवरे याच्याकडून विनापरवाना लोखंडी खंजर जप्त करण्यात आला.
- अवैध दारू जप्त (मुक्रामाबाद व कंधार): मुक्रामाबाद येथे १५,५०० रुपयांची हातभट्टी दारू तर कंधार येथे ६,२९० रुपयांची देशी दारू जप्त करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले.
६. शेतीच्या नापिकीला कंटाळून गळफास
नायगाव: गडगा येथील ४६ वर्षीय शेतकरी संभाजी शंकर नागठाणे यांनी शेतीच्या सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. नायगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
– प्रतिनिधी माधव वाघमारे











