नांदेड, दि. 8 नोव्हेंबर : (प्रतिनिधी) माधव वाघमारे नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा नगरपरिषद तसेच हिमायतनगर नगरपंचायत या 13 नगरी स्थानिक संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या कालावधीत कुठेही तणाव निर्माण होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व यंत्रणांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी झालेल्या निवडणूक सनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी निवडणूक व्यवस्थापन, देखरेख व नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीतून सहभागी होते.
१० नोव्हेंबरपासून नामनिर्देशन
सोमवारपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होत असल्याचे सांगताना जिल्हाधिकाऱ्यांनी शहरांमध्ये सतत निगराणी पथके ठेवण्यावर भर दिला. पेड न्यूज, इंटरनेट, सोशल मीडिया यावर तपासणी वाढवावी तसेच रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ व शस्त्र वाहतुकीवर कठोर नियंत्रण आणावे. या कार्यवाहीचे दैनंदिन अहवाल जिल्हास्तरावर सादर करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांनी मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुविधांची पाहणी करावी व उणीव तात्काळ दूर करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
“तक्रार निवारण कक्ष अत्यावश्यक”
निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व स्तरांवर समित्या स्थापन करून एकल खिडकी प्रणालीद्वारे परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले. तक्रार निवारण कक्ष सुरू करणे, निर्भय वातावरण निर्मितीसाठी प्रतिबंधात्मक उपाय राबवणे व उमेदवारांना नवीन बँक खाते उघडण्यात बँकांनी सक्रिय सहकार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.












