नांदेड | दि. 19 डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांततेचा भंग करणाऱ्यांवर नांदेड पोलिसांनी सिटी स्ट्रिट सेफ्टी ड्राईव्ह अंतर्गत कडक कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली 17 व 18 डिसेंबर 2025 रोजी शहरातील विविध भागांत ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
या मोहिमेत अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. सरज गुरव, तसेच प्रमुख सपोनि व पोलीस अमलदार सहभागी झाले होते. पेट्रोलिंगदरम्यान सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्या इसमांवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 अन्वये कारवाई करण्यात आली.
कारवाईचे ठळक तपशील :
- पोलीस स्टेशन शिवाजीनगर हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान कविता रेस्टॉरंट परिसरात 02 इसमांना मध्यरात्री सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना पकडण्यात आले.
- पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीत ढवळे कॉर्नर भागात 02 इसमांवर अशीच कारवाई करण्यात आली.
- पोलीस स्टेशन इतवारा हद्दीत आंबेडकर नगर परिसरात 01 इसम मद्यधुंद अवस्थेत आढळून आला.
- दामिनी पथक यांनी विशालनगर परिसरात पेट्रोलिंग करताना 06 इसमांना सार्वजनिक शांततेचा भंग करताना ताब्यात घेतले.
यासोबतच संबंधित भागांतील दारूची दुकाने, वाईन शॉप्स व हॉटेल्सची तपासणी करून नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस अधीक्षक मा. श्री. अबिनाश कुमार यांनी स्पष्ट इशारा दिला की, सार्वजनिक ठिकाणी दारू पिणे, पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे किंवा शांततेचा भंग केल्यास संबंधितांवर पुढेही कठोर कारवाई करण्यात येईल. नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा सातत्याने सुरू राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.












