नांदेड (प्रतिनिधी) माधव वाघमारे
बोंढार नेरली येथे आज दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान–2025 अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती नांदेडचे गट विकास अधिकारी श्री. प्रविण सुरडकर यांच्या हस्ते तर श्री. व्ही. बी. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमास सरपंच श्री. मारोती बागल, ग्रामसेवक श्रीमती माधवी आईनवार, ग्रामपंचायत सदस्य, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमांतर्गत भारतीय सैन्यात कार्यरत जवान श्री. भगवान बुद्धाजी बिस्मिल्ले तसेच अग्निवीर म्हणून भारतीय सीमेवर कार्यरत श्री. विशाल प्रभाकर आरसुळे यांच्या आई-वडिलांचा जाहीर सत्कार करून राष्ट्रसेवेचा गौरव करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत नमुना नंबर 8 मधील घरे पती-पत्नी यांच्या संयुक्त नावावर नोंदणी करून श्री. सौ. गंगाबाई व केशवराव आरसुळे तसेच सौ. तारामती व पंजाबराव आरसुळे यांना नोंदीच्या नक्कल प्रदान करण्यात आल्या.
गावातील विधवा महिलांना ग्रामपंचायत लोकवर्गणीतून साडी-चोळी भेट देण्यात आली. यामध्ये श्रीमती केरुबाई संभाजी वड्डे, श्रीमती मुक्ताबाई कोंडीबा आरसुळे यांच्यासह एकूण 20 महिलांचा समावेश होता.
हनुमान मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते 200 फळझाडांची वृक्षलागवड करण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छतेसाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून घनकचरा व्यवस्थापन शेडच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. जलतारा शोषखड्यांच्या एकूण 85 कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास श्री. विठ्ठल नेमाजी आरसुळे, श्री. कोंडीबा नागोजी आरसुळे, श्री. महादु नामदेव आरसुळे, श्री. बालाजी श्रावण सोनटक्के, श्री. अक्षय आरसुळे, अर्जुन आरसुळे, शिवाजी शिंदे, चांदू बागल यांच्यासह सर्व बचतगटातील महिला, अंगणवाडी कर्मचारी, शाळेतील सहशिक्षक व ग्रामपंचायत स्तरावरील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे गावात विकासाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.












