(सांस्कृतिक प्रतिनिधी नांदेड)
(दि. २६ डिसेंबर २०२५)
बोधडीसारख्या आदिवासी भागात हजारो अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात संगीताच्या माध्यमातून प्रकाश निर्माण करणारे थोर संगीतकार व गायक पंडित वसंतराव शिरभाते यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त गुरुवार दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी अंध विद्यालय, बोधडी बुद्रुक (ता. किनवट) येथे भव्य कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेलू येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ कीर्तनकार किर्तनकेसरी ह.भ.प. वसंतबुवा मंडलिक महाराज यांनी रागदारीने बहरलेले सुश्राव्य कीर्तन सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी स्व. पंडित वसंतराव शिरभाते यांचे सुपुत्र, सुप्रसिद्ध दूरदर्शन व आकाशवाणी कलावंत पंकज शिरभाते यांनी प्रस्तावना करताना वडिलांच्या अंध विद्यालयाशी निगडित आठवणी सांगून त्यांच्या कार्यामुळे आज शेकडो अंध विद्यार्थी महाराष्ट्राचे नाव उज्वल करत असल्याचे भावनिक प्रतिपादन केले.
यानंतर कीर्तनकार, साथीदार कलाकार तसेच स्व. वसंतराव गुरुजींचे ज्येष्ठ व गुणी विद्यार्थी यांचा गुरुमाऊली श्रीमती शारदाताई वसंतराव शिरभाते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी वासुदेव मानीकराव राजूरकर, विशाल शेरे, शंकर संगेवार, यशवंत देशपांडे, भक्तराज होळंबे, दशरथ जाधव (मामा), प्रकाश अंकमवार, मोहन शिंगणे, राजेश ठाकरे, कर्नुलवार सर, रघुनाथ पांचाळ, अंध विद्यालय बोधडीच्या प्राचार्या नंदाताई नवसागरे, गंगुताई पांचाळ, सोमवंशी सर, साहेबराव मस्के सर, गणेश येरकडे सर आदी मान्यवरांचा समावेश होता. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विशाल शेरे यांनी केले.
त्यानंतर किर्तनकेसरी ह.भ.प. वसंतबुवा मंडलिक महाराजांचे भव्य कीर्तन रंगले. कीर्तनाच्या उत्तरार्धात त्यांनी संत नामदेव महाराजांची विठ्ठल भक्तीची हृदयस्पर्शी कथा सादर केली. सत्तरीत पदार्पण करणाऱ्या वसंतबुवांनी खड्या स्वरातील रागदारी पदे व गोड चालीत अभंग सादर करत रसिकांची मने जिंकली.
या कीर्तनास व्हायोलिनवर सुप्रसिद्ध आकाशवाणी व दूरदर्शन कलावंत पंकज शिरभाते, संवादिनीवर डॉ. प्रमोद देशपांडे व तबल्यावर ज्येष्ठ कलावंत दत्ता पांचाळ यांनी उत्कृष्ट साथसंगत केली. तसेच कलावंत राजेश ठाकरे यांनी सुंदर स्वर साथ दिली.
या कार्यक्रमास अंध विद्यालय बोधडीचे आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच परिसरातील असंख्य कलारसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आदिवासी कला शिक्षण संस्था, किनवटचे अध्यक्ष राजू भीमराव टारपे, सचिव प्रकाश भीमराव टारपे, अंध विद्यालय बोधडीच्या प्राचार्या नंदाबाई नवसागरे, संगीत शिक्षक राजेश ठाकरे व पंकज, संतोष तसेच शिरभाते परिवाराने विशेष परिश्रम घेतले.












