नांदेड, दि. ३० डिसेंबर (प्रतिनिधी) माधव वाघमारे राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. सध्या नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याचा अंतिम टप्पा सुरू असताना आणि लवकरच प्रचाराला सुरुवात होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली सनियंत्रण समितीची बैठक आज (दि. ३०) महापालिकेत संपन्न झाली.
या बैठकीस पोलीस अधीक्षक कार्यालय, आयकर विभाग, विक्रकर विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखणे, आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि आर्थिक गैरप्रकारांना आळा घालणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता.
बैठकीच्या प्रारंभी निवडणूक विभागाचे उपआयुक्त नितीन गाढवे यांनी प्रभाग रचना, आरक्षण निश्चिती, मतदार यादी, मतदान केंद्रांची निश्चिती, निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्ती तसेच निवडणूक कार्यक्रम याबाबत सविस्तर माहिती सादर केली. सनियंत्रण समितीच्या माध्यमातून निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा गैरवापर रोखणे आणि मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तूंच्या वाटपावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
यावेळी बोलताना पालिका आयुक्त डॉ. डोईफोडे यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, मद्य, पैसा, वस्तू यांसारख्या आमिषांच्या वाटपावर तसेच रोख रकमेच्या ने-आणीवर करडी नजर ठेवली जाणार आहे. विमानतळ, रेल्वे स्थानके, हॉटेल्स, फार्महाऊस यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांवर विशेष देखरेख ठेवण्यात येणार असून, बँका व पतसंस्थांमार्फत होणाऱ्या मोठ्या व संशयास्पद आर्थिक व्यवहारांवरही लक्ष ठेवले जाणार आहे.
तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पेड न्यूज, सोशल कमेंट्स, सोशल मीडिया व इंटरनेटवरील प्रचारावर देखील सतत निरीक्षण ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणताही नियमभंग आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने, उपायुक्त नितीन गाढवे, उपायुक्त स. अजितपालसिंघ संधु, आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड, विक्रकर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत गांगुर्डे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे एस. एल. कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, प्रादेशिक परिवहन विभागाचे सह प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रशांत कणकरेज आणि महावितरणचे कार्यालय अधीक्षक विजय घनबहादुर यांची प्रमुख उपस्थिती होती.












