प्रतिनिधी – माधव वाघमारे
नांदेड अर्धापूर: ७ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
अवैध रेती वाहतुकीविरोधात पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या मोहिमेंतर्गत अर्थापूर पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. वसमत फाटा-मेंडला रस्त्यावर महाराष्ट्र हॉटेलसमोर सार्वजनिक रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये १२ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांच्या नेतृत्वाखालील पथक गस्तीवर होते. त्यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एका टाटा कंपनीच्या टीएम क्रमांक MH-26-AD-2228 या वाहनाला पकडले. हे वाहन अवैधपणे रेतीची वाहतूक करत असल्याचे आढळून आले. वाहन तपासणी केली असता त्यामध्ये अंदाजे २ द्वास रेती (अंदाजे १० हजार रुपये किमतीची) आढळून आली. वाहन चालक ज्ञानेंद्र बालाजी आढाव (वय ३१, रा. कासारखेडा, ता.जि. नांदेड) याला रेती वाहतुकीचा परवाना विचारला असता त्याने परवाना नसल्याचे कबूल केले.
पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल करून वाहन व रेती असा एकूण १२ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णुकांत क-हाळे, पोलीस हवालदार संभाजी गौरकर, संतोष काळे, पोलीस नाईक संजय घोरपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल विजय कदम यांच्या पथकाने केली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अर्थापूर पोलीस पथकाचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
पोलीस अधीक्षक नांदेड श्री. अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील (भोकर), सुरज गुरव (नांदेड) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजीवन मिरकले (नांदेड ग्रामीण) यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार घोरपडे करत आहेत.












