प्रतिनिधी २५ सप्टेंबर माधव वाघमारे
- नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांतील पाहिजे व फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशान्वये विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याच अनुषंगाने सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंजराचा धाक दाखवून रोख रक्कम लुटणाऱ्या ३ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा, नांदेडच्या पथकाने तत्परतेने सापळा रचून अवघ्या काही तासांत ताब्यात घेतले आहे.
- घटनेची पार्श्वभूमी: फिर्यादी बालाजी भीमराव घोगरे (रा. पांगरी, ता. जि. नांदेड) हे आपले साथीदार यांच्यासह दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पांगरी येथून दोन बैल पायी घेऊन उस्माननगर येथे जात होते. उस्माननगर रोडवरील आनंद बारजवळ रात्री ०२.४५ वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात ३ इसमांनी त्यांना अडविले. आरोपींनी फिर्यादीस खंजराचा धाक दाखवून, धक्काबुक्की व शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या खिशातील ५,०००/- रुपये रोख रक्कम जबरीने काढून घेतली. या घटनाप्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे, सोनखेड येथे गु.र.नं. २३२/२०२६, कलम ३०९(४) भारतीय न्याय संहिता (BNS) सह कलम ४/२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
- स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई: गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन यांनी पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते, त्यानुसार एलसीबीचे तपास पथक आरोपींच्या शोध Mसाठी सोनखेड हद्दीत रवाना झाले होते. तपास पथक आरोपींचा माग काढत असताना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे ढाकणी शिवारारतील ‘शिवा फॅक्टरी’च्या मागील परिसरात थांबले आहेत. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने ढाकणी शिवार येथे तात्काळ छापा टाकून वर्णनाप्रमाणे खालील ३ आरोपींना ताब्यात घेतले:
- अजय राजाराम कांबळे (वय २१ वर्षे, व्यवसाय – हॉटेल चालक, रा. ढाकणी, ता. लोहा, जि. नांदेड).
- करण संजय कांबळे (वय २० वर्षे, व्यवसाय – मिस्त्रीकाम, रा. किवळा, ता. लोहा, जि. नांदेड).
- भिमाशंकर उर्फ शंकर सुरेश चित्ते (वय २१ वर्षे, व्यवसाय – मिस्त्रीकाम, रा. किवळा, ता. लोहा, जि. नांदेड).
- गुन्ह्याची कबुली व पुढील कारवाई: ताब्यात घेतलेल्या तिन्ही आरोपींकडे सखोल विचारपूस केली असता, त्यांनी सोनखेड हद्दीतील जबरी चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे, सोनखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
- मार्गदर्शन व पथक: सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मा. डॉ. नीलाभ रोहन, तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस निरीक्षक अतुल भोसले,API विठ्ठल नागरगोजे मिलिंद नरबाग सपोनि/ विठ्ठल घोगरे व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार बोधगीरे, कदम, राठोड, यादव, कलंदर, अकबर पठाण यांनी पार पाडली आहे.
(माहिती स्रोत: जनसंपर्क अधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड)











