प्रतिनिधी : माधव वाघमारे
नांदेड, दि. ८ मार्च : चंदामामा प्ले स्कूलचा २१ वा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ‘कार्निव्हल ऑफ ट्रेंडिंग साँग्स’ या संकल्पनेवर आधारित रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यकाल ७ मार्च रोजी डीआरएम कार्यालय संकुल, एअरपोर्ट रोड येथील रेल्वे ऑफिसर्स क्लबमध्ये पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संघटना (SCRWWO), नांडेदच्या अध्यक्षा सौ. प्रंधन्या कामले होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री प्रदीप कामले यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री सीएच. कल्याण राजू यांनीही मान्यवर म्हणून कार्यक्रमाला गौरविले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे श्री प्रदीप कामले यांनी आपल्या भाषणात प्राथमिक शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. तसेच लहान वयातच संस्कार आणि शिक्षणाची पायाभरणी समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले.
या स्नेहसंमेलनाचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम होते. ‘कार्निव्हल ऑफ ट्रेंडिंग साँग्स’ या संकल्पनेखाली सादर झालेल्या नृत्य आणि संगीताने उपस्थित पालक आणि पाहुण्यांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या उत्साही सादरीकरणामुळे संपूर्ण सभागृह एकाच आनंदात न्हाऊन निघाले.
यावेळी वर्षभरात शैक्षणिक व इतर उपक्रमांमध्ये प्रामाणिकपणा, समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच शिक्षकांना गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याने विजेत्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले.
चिमुकल्यांच्या मनमोहक सादरीकरणाने पालक, शिक्षक आणि पाहुण्यांच्या मनात आनंददायी आठवणी निर्माण करत कार्यक्रमाची सांगता झाली. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पालकांनी परिश्रम घेतले.












