नांदेड:३१ मार्च प्रतिनिधी माधव वाघमारे
नांदेड शहरातील सार्वजनिक शांतता भंग करणाऱ्या आणि रस्त्यावर मद्यप्राशन करून उपद्रव माजवणाऱ्या तळीरामांविरुद्ध नांदेड पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असलेल्या ‘सिटी स्ट्रीट सेफ्टी ड्राईव्ह’ (City Street Safety Drive) अंतर्गत शहरातील विविध भागात धडक कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
२९ आणि ३० मार्च रोजी विशेष मोहीम
नांदेड शहरात सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी ही मोहीम राबवण्यात येत आहे. २९ व ३० मार्च २०२६ रोजी विशेष पथकाद्वारे शहरातील विमानतळ, वजीराबाद, नांदेड ग्रामीण आणि विष्णुपूरी परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ११०/११७ नुसार कारवाई करण्यात आली आहे.
पथकाची विविध ठिकाणी कारवाई:
- विमानतळ परिसर: पेट्रोलिंग दरम्यान वसंतराव नाईक चौक येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून शांतता भंग करणाऱ्या एका व्यक्तीवर कारवाई करण्यात आली. तसेच परिसरातील दारू दुकाने आणि वाईन शॉपची तपासणी करण्यात आली.
- वजीराबाद: कलामंदिर परिसरात एका इसमावर कारवाई करण्यात आली. येथील पथकाने हद्दीतील हॉटेल आणि वाईन शॉपवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
- नांदेड ग्रामीण: एमआयडीसी परिसरात दोन व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. औद्योगिक परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत.
- दामिनी पथकाची मोठी कारवाई: दामिनी पथकातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशवंत महाविद्यालय रोड आणि विष्णुपूरी कोचिंग क्लासेस परिसरात मोठी कारवाई केली. येथे आरडाओरड करून गोंधळ घालणाऱ्या तब्बल ०८ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांचे आवाहन
नांदेड शहरात कोणीही सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करू नये, तसेच मद्यप्राशन करण्यासाठी जागा उपलब्ध करून देऊ नये. सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड इशारा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिला आहे. नागरिकांनी शहराच्या शांतता आणि सुव्यवस्थेसाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख सपोनि श्री भागवत नागरगोजे, चार्ली पोलीस आणि दामिनी पथकाने यशस्वी केली.












